ग्रामपंचायत येरमनार येथील पदाधिकार्यांनी ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले

0
13

आलापल्ली, २७: अहेरी तालुक्यात येत असलेल्या येरमनार ग्रामपंचायत कार्यालयातील ग्रामसेविकेच्या मनमानी कारभार सुरु असतांना याबाबत पंचायत समितीला वारंवार तक्रारी सादर करुनही कोणतीही कार्यवाही करण्यात न आल्याने अखेर ग्रामपंचायत येरमनार येथील पदाधिकार्यांनी ग्रामपंचायतीला काल, २६ सप्टेंबर रोजी कुलूप ठोकले. तसेच आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.

सद्यस्थितीत येरमनार ग्रामपंचायत कार्यालयात केवळ जुनेच रेकाॅर्ड ठेवण्यात आले आहेत. तसेच नागरीकांनी आवश्यक दाखल्यांची मागणी केली असता ग्रामसेविकांनी आवक – जावक रजिस्टर नाही, मी तुम्हाला नंतर दाखले देईल असे सांगितले. चालू रेकाॅर्ड मुख्यालयी ठेवण्यात न आल्यामुळेच नागरीकांना वेळेवर दाखले उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
अनेकदा पंचायत समितीला, संवर्ग विकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांच्याकडे तक्रार, निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र चार महिन्याचा कालावधी लोटूनही यावर कोणतीच चौकशी करण्यात आली नाही. त्यामुळे येरमनार ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरीकांनी मुख्यालयी कागदपत्रे ठेवण्याकरीता व ग्रामसेविकेवर कारवाईची मागणी करीत ग्रामपंचायतीला कुलूप ठोकले.
यावेळी सरपंच बालाची गावडे, उपसरपंच पोचा तलांडी, ग्रा. पं. सदस्य विजय आत्राम, लैला गावडे, बेबी गावडे आदींसह गावकरी उपस्थित होते.