मालकांना प्रलंबित गोदाम भाडे मिळणार,तूटीतूनही होणार सुटका -पालकमंत्री

0
16
गोंदिया, दि. 27 – आधारभूत हमी धान खरेदी योजनेंतर्गत खरेदी केलेल्या धानाच्या साठवणूकीसाठी भाड्याने घेतलेल्या खासगी गोदामांचे 2009 पासून प्रलंबित असलेले गोदाम भाडे तातडीने देण्यात यावे असे आदेश सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिले. आज मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालायात पत्रकारांसोबत बोलतांना त्यांनी ही माहिती दिली.
विदर्भातील धान उत्पादक पाच जिल्ह्यातील धान खरेदी करणाऱ्या सहकारी संस्थाच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बडोले यांच्या अध्यक्षतेखाली अलिकडेच मंत्रालयात बैठक पार पडली होती. यासंबंधी माहिती देतांना बडोले म्हणाले की, अन्न नागरी पुरवठामंत्री गिरीष बापट यांच्या दालनात झालेल्या सदर बैठकीत आमदार चरणभाऊ वाघमारे, विजय राहांगडाले, संजय पुराम, गिरीष व्यास तसेच सहकारी संस्थांच्या संघटनेचे अध्यक्ष नामदेव कापगते, उपाध्यक्ष केवलराम पुस्तोळे, माजी आमदार भरसिंगभाऊ नागपुरे, रमेश चुऱ्हे,
तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी या संस्थांनी अनेक समस्या मांडल्याचे बडोले म्हणाले.
आधारभूत  हमी भाव धान खरेदी योजनेंतर्गत खरेदी केलेल्या धानाची साठवणूक करण्यासाठी भाड्याने घेतलेल्या खासगी गोदामांचे 2009 ते 2016-17 पर्यंतचे भाडे गोदाम मालकांना मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी पुढील हंगामात गोदाम भाड्याने देण्यास नकारात्मक भुमिका घेतली होती. त्यामुळे गोदाम मालकांना तातडीने प्रलंबित गोदामभाडे देण्याचे आदेश देण्यात आल्याचे बडोलेंनी स्पष्ट केले.
सदर सहकारी संस्थांनी केलेल्या मुख्य मागण्यांपैकी 2012 ते 2015 या कालावधीतील धान साठवणूकीतील तूटही माफ करण्यात आली असून मिलर्सना दंडनीय रकमेत देण्यात आलेल्या सवलतीप्रमाणे या खरेदी संस्थांनाही दंडातून वगळण्यात  आले आहे, त्यामुळे धान खरेदी करणाऱ्या सहकारी संस्थांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बडोले यांनी सांगितले.महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशन लिमीटेडची सब एजंट म्हणून या सहकारी संस्थांनी खरेदी केलेला धान साठा शासकीय यंत्रणे्ने 40-45 महिने उशीराने उचलल्यामुळे घट येत होती. मात्र त्याची वसूली खरेदी संस्थांच्या कमिशनमधून करण्यात येत होती. त्यामुळे धान खरेदी सहकारी संस्थांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी धानसाठ्याची तूटही माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला असे बडोले म्हणाले.