मुख्य बातम्या:

सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी लोकसहभागाला प्राधान्य द्या- पणन मंत्री सुभाष देशमुख

मुंबई, दि. 27 : राज्यातील विविध सहकारी संस्थांच्या बळकटी करणासाठी अधिकाधिक लोकसहभागाला प्राधान्य द्यावे. तसेच राज्यातील गाव व तालुका पातळीवरील सर्वच खरेदी विक्री संघांची वार्षिक उलाढाल योग्य प्रमाणात झाली पाहिजे, हे खरेदी विक्री संघ सक्षम झाली तरच राज्य  आर्थिकदृष्ट्या समृद्ध होईल, असे पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे सांगितले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आज दि महाराष्ट्र स्टेट को -ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन लि मुंबई ची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. त्यावेळी श्री. देशमुख बोलत होते.
श्री. देशमुख म्हणाले, राज्यात २२ हजार विविध कार्यकारी सहकारी संस्था आहेत, अशा सहकारी संस्थांना दि महाराष्ट्र स्टेट को – ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनने खरेदी विक्री संघांना आवश्यक भाग भांडवल, कर्ज देण्यास मदत करावी आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्यास प्रवृत्त करावे.महात्मा गांधी यांनी खेड्याकडे चला हा दिलेला संदेश सहकार क्षेत्राला आजही लागू पडतो. दि महाराष्ट्र स्टेट को – ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनने ग्रामीण भागातील बचत गटांना तसेच खरेदी विक्री संघाना केंद्रबिंदू मानून त्यांना आर्थिक सक्षम करण्यावर भर द्यावा. ग्रामीण भागातील खरेदी विक्री संघ आणि बचत गटांनी शेतकऱ्यांच्या उत्पादनासाठी बाजार पेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत. या माध्यमातून महाराष्ट्राचा “महा ब्रँन्ड” या नावाने उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करुन द्यावी.
या सर्वसाधारण सभेला दि महाराष्ट्र स्टेट को – ऑपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष जे पी गुप्ता यांच्यासह राज्यभरातील सर्व सहकारी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Share