राजुरा वनपरिक्षेत्रात १४ सागवृक्षांची कत्तल

0
20

चंद्रपूर,दि.28 : जिल्ह्यातील राजुरा वनपरिक्षेत्रातील सुमठाणा कक्ष क्रमांक १६६ मध्ये अज्ञात चोरट्यांनी तब्बल १४ सागाच्या वृक्षांची कत्तल करून ते ट्रकमध्ये ेटाकले. मात्र पावसाने ट्रक फसल्याने चोरीचा बेत फसला. ही घटना सोमवारी उघडकीस आली. घटनास्थळावरून ट्रकसह तीन लाख ८० हजारांची सागाची लाकडे वनविभागाने जप्त केली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध वनअधिनियम कायदा १९२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सुमठाणा कक्षात सागाच्या झाडांची कत्तल करून लाकडे एमएच १९ झेड २४२८ क्रमांकाच्या ट्रकमध्ये टाकून असल्याची बाब गावकरी व वनमजुरांच्या निदर्शनास आली. यानंतर राजुरा वनपरिक्षेत्राधिकारी अशोक मेडपल्लीवार यांना याची माहिती देण्यात आली. त्यांनी सहकाºयांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला असता तब्बल १४ सागांच्या वृक्षांची कत्तल केल्याचे दिसून आले. या कटाई केलेल्या झाडांचे प्रत्येकी पाच घनमीटर आकाराची तब्बल ५७ नग लाकडे कापून त्यातील १८ नग लाकडे ट्रकमध्ये ठेवण्यात आली होती, तर उर्वरित ३९ नाग लाकडे ट्रकच्या बाजूला टाकून ठेवलेली होती. त्या परिसरात चोरट्यांचे कपडे आणि आºया, भोसे हे साहित्यही पडून असल्याचे आढळले. चोरटे रात्रीलाच आले असून त्यांनी तब्बल १४ साग वृक्षांची कत्तल करून ती लाकडे ट्रकमध्ये भरली. मात्र रात्री पाऊस आल्यामुळे ट्रक फसला. अशातच सकाळ झाल्यामुळे चोरटे घटनास्थळावरून पसार झाल्याचा कयास वनविभाग लावत आहे. वनविभागाच्या नाकावर टिचून जंगलातील सागवृक्षांची कत्तल करण्यात आली. पावसामुळे ही घटना उघड झाली.