गोंदियाची सुमेधा चालविणार नागपूरची मेट्रो; प्रवासासाठी ‘महाकार्ड’

0
16

नागपूर,दि.30- एअरपोर्ट ते खापरी हा पाच किलोमीटरचा मेट्रो रेल्वेचा मार्ग तयार झाला असून, येत्या ३० सप्टेंबरपासून ट्रायल रनला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात मेट्रोचा प्रवास करण्यासाठी लागणाऱ्या ‘महाकार्ड’चेही लोकार्पण होणार आहे. मेट्रो रेल्वेसोबत शहर बसमध्येही प्रवास करण्यासाठी या कार्डचा वापर होणार आहे.मध्यप्रदेशातील बालाघाट येथे प्राथमिक शिक्षण झालेली सुमेधा गेल्या कित्तेक वर्षांपासून गोंदियामध्ये स्थायिक झाली आहे. वडील सार्वजनिक बांधकाम विभागात आणि आई पोस्टात काम करत असल्याने सुमेधाला आधीपासूनच शिक्षणाचे धडे मिळाले. ३ भाऊ असणाऱ्या सुमेधाला तिच्या पालकांनी मुलगी म्हणून कधीच मागे राहू दिले नाही. आवडीच्या क्षेत्रात जाण्यासाठी सुमेधाला घरच्यांनी सूट दिली. या सुटीचा फायदा घेत सुमेधाने मेट्रोत सुसाट धाव घेतली.बीई इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या सुमेधाला मेट्रो रेल्वेत ७ वर्षे काम केल्याचा अनुभव आहे. या ७ वर्षांपैकी ४ वर्षे सुमेधाने दिल्ली मेट्रो रेल्वे चालविली. त्यानंतर ३ वर्षे वरिष्ठ स्टेशन कंट्रोलर म्हणून तिने काम केले. ७ वर्षांचा अनुभव पाठीशी असलेल्या सुमेधाकडे आता नागपूर मेट्रो रेल्वे चालविण्याची जबाबदारी आली आहे. नागपूर मेट्रो रेल्वेची ट्रायल सुरू असून त्यात आता सुमेधा व्यस्त आहे. आत्मविश्वासाने सुमेधा आता मेट्रो रेल्वेला गती देण्याचे काम करीत आहे.
शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी होऊ घातलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला काम सुरू होऊन अडीच वर्षे झाले. या अडीच वर्षांत ५० टक्के काम पूर्ण झाले असून, २ हजार २०० कोटी रुपये आतापर्यंत खर्च करण्यात आले. न्यू एअरपोर्ट ते खापरी हा मार्ग तयार झाला आहे. विजेच्या साहाय्याने या मार्गावर मेट्रो रेल्वे धावत असून टेस्टिंगचे काम सुरू आहे. ३० सप्टेंबर रोजी दुपार १२ वाजता ट्रायल रनसाठी हिरवी झेंडी दाखविण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य, महापौर नंदा जिचकार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह नागपुरातील खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत.
सध्या कॅशलेस व्यवहारावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला असला तरी कॅशलेस व्यवहारासाठी अधिकचे शुल्क आकारले जात आहे. या पार्श्वभूमीवर स्मार्ट कार्डसाठी प्रवाशांना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार का, याबाबतचा प्रश्न कायम होता. स्मार्ट कार्डवर कुठलेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसल्याचे दीक्षित यांनी सांगितले. उलट एका महिन्यात ६० वेळा या कार्डचा वापर करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा महामेट्रो विचार करीत असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.आटोमोटीव्ह चौक ते मिहान आणि प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर या ३८ किलोमीटरच्या मेट्रो रेल्वे मार्गाचे बजेट ८ हजार ६८० कोटी रुपये आहे. वेळेत काम करणे, योग्य नियोजन यामुळे प्रकल्पाच्या किमतीत साडेआठ टक्क्यांची बजत करणे शक्य झाले असल्याचा दावा दीक्षित यांनी केला. पूर्ण प्रकल्प पूर्ण होईपर्यंत १० टक्क्यांची बजत करण्याचे उद्दिष्ट असल्याचीही त्यांनी सांगितले.
मेट्रो रेल्वेच्या प्रवासासाठी वापरण्यात येणारे कार्ड ओपन लूप आहे. इतर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी क्लोस लूप कार्ड वापरल्या जात आहे. क्लोस लूप कार्ड केवळ मेट्रोच्या प्रवासासाठीच वापरल्या जाते. मात्र ओपन लूप कार्डचा वापर इतर सेवेचा लाभ घेण्यासाठीही करण्यात येते. महामेट्रोच्या कार्डचा वापर शहर बससेवेसाठीही करण्यात येणार आहे. याबाबत महापालिकेसोबत बोलणे झाले असल्याचे दीक्षित यांनी सांगितले. या कार्डवर अधिकाधिक सेवा कशा उपलब्ध करून देता येईल यावरही महामेट्रो विचार करीत आहे. ज्यांना स्मार्ट कार्डचा वापर करणे शक्य नाही त्यांच्यासाठी क्यूआर कोडचे तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
मेट्रो रेल्वेचा डीपीआर तयार केला तेव्हा त्यात स्मार्ट कार्ड तयार करणे, स्टेशनवर त्याची यंत्रणा उभी करणे यासाठी २०० कोटी रुपयांच्या तरतूद केली होती. इतर मेट्रो रेल्वेसाठी मेट्रोनेच ही यंत्रणा खर्च करून उभी केली आहे. मात्र नागपूर मेट्रो रेल्वेसाठी या कार्डचा भार स्टेट बँक ऑफ इंडियाने उचलण्याचे ठरविले आहे. महामेट्रोने काढलेल्या टेंडरला एसबीआयने प्रतिसाद दिला. २०० कोटी रुपयांच्या खर्च एसबीआयने उचलून ३० कोटी रुपये महामेट्रोला देण्याचेही मान्य केले असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.