मेट्रो निर्धारित वेळापत्रकानुसार धावणार असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

0
19
नागपूर,दि.30 : नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे जलद दळण-वळणाच्या सुविधा उपलब्ध होणार असून या प्रकल्पामुळे २० हजार लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच मेट्रो रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून अत्याधुनिक सेवा व सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे हा प्रकल्प आर्थिक विकासाचे ग्रोथ इंजिन असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.नागपूर मेट्रोच्या ट्रायल रनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवी झेंडी दाखविल्यानंतर माझी मेट्रोला प्रत्यक्ष सुरुवात झाली. नागपूर मेट्रो प्रकल्प हा शहराचे चित्र बदलणारा महत्वाकांक्षी प्रकल्प असून केवळ २७ महिन्यात साडेपाच किलोमीटरच्या ट्रायल रनला सुरुवात झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या महाकार्ड सेवेचा शुभारंभही यावेळी झाला.ट्राय़ल मेट्रो चालविण्याचा मान गोंदियाची सुमेधा मेश्रामला मिळाला.
मिहान प्रकल्प परिसराच्या मिहान डेपो येथे नागपूर मेट्रोच्या ट्रायल रन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष श्रीमती अरुंधती भट्टाचार्य विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर महापौर नंदाताई जिचकार, खासदार कृपाल तुमाने, डॉ. विकास महात्मे, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, समीर मेघे, डॉ.मिलिंद माने, सुधीर पारवे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय सचालक डॉ.ब्रिजेश दीक्षित, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, नासुप्रचे सभापती डॉ.दीपक म्हैसेकर आदी उपस्थित होते.
सर्वांच्या स्वप्नातील माझी मेट्रो वेगाने आकार घेत आहे. या वेगाने देशातल्या कोणत्याही मेट्रोचे काम पुढे गेले नसल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करुन नागपूर मेट्रोच्या अधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले तसेच नागपूर मेट्रो बुटीबोरी, हिंगणा, कन्हानपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मेट्रो स्टेशनच्या माध्यमातून नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होतील. त्यामुळे रस्त्यावरील ताणही कमी होईल. मॉरेस कॉलेज टी पाइंट तसेच पुणे येथील स्वारगेट येथे मोठा हब महामेट्रोतर्फे उभारण्यात येणार असून सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. मेट्रो प्रकल्पाच्या प्रगतीमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा महत्त्वाचा सहभाग असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
एसबीआयच्या महाकार्डद्वारे सर्व सेवांचा लाभ
स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे मेट्रो रेल्वेसाठी महाकार्डचा शुभारंभ होत असून या कार्डाद्वारे रेल्वेसह सर्व सुविधांसाठी कार्डचा वापर होणार आहे. त्यामुळे महामोबिलिटी कार्ड राज्यातील सर्व मेट्रो, बस, टोल नाके, महानगरपालिका आदी साठी एकत्रितपणे लागू करण्यात येणार असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, स्टेट बँकेने मेट्रो सेवा सुरु होण्यापूर्वीच महाकार्ड लाँच केले आहे. पोर्टतर्फे वाहतूक मार्गदर्शनासंबंधात ॲप तयार करण्यात आले असून तीनशे मीटर परिसरात जीपीएस सिस्टीमद्वारे वाहतुकीच्या मार्गासंदर्भात मार्गदर्शन मिळणार आहे. ही सुविधा नागपूरसह राज्यात सुरु करण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.