नारायण राणेंकडून नव्या राजकीय पक्षाची घोषणा;NDA चे तासाभरातच आमंत्रण

0
9

मुंबई,दि.01(विशेष प्रतिनिधी) – माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अखेर आज आपल्या नव्या राजकीय पक्षाची म्हणजेच ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा’ची घोषणा केली. नारायण राणेंच्या या पत्रकार परिषदेला नीलेश राणे उपस्थित होते तर नितेश राणे उपस्थित नव्हते. नवीन पक्षाच्या स्थापनेनंतर राणे समर्थकांकडून कोकणात जल्लोष करण्यात आला. पक्षाचा झेंडा, चिन्ह लवकरच प्रसिद्ध करू असे राणेंनी सांगितले. पक्ष स्थापन केल्यानंतर नारायण राणेंना एनडीएत येण्याचे भाजपने निमंत्रण दिले असून नारायण राणेंनी एनडीएचे हे आमंत्रण स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे. पक्ष स्थापनेच्या तासाभरात राणेंना एनडीएचे बोलावणे आले.
नव्या राजकीय पक्षाची घोषणा करताना राणे म्हणाले, “माझा नवा पक्ष राज्यघटनेवर अविचल निष्ठा ठेवून, घटनेच्या चौकटीत राहून राज्याच्या विकासासाठी सनदशीर मार्गाने प्रयत्न करणार. पक्षाचे चिन्ह, झेंडा लवकर घोषित करू. नोंदणीही लवकरच करू. शिवसेना, काँग्रेस तसेच सत्तेतील अनुभवातून राज्याचा विकास करण्यात आमचा पक्ष नक्कीच यशस्वी होईल. सामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठीच राजकारण करू. दिला शब्द पाळू हेच आमचे ब्रीद वाक्य असेल.”
शिवसेना नंबर एकचा विरोधक असेल. सैनिक नव्हे तर उद्धव यांना विरोध. चांगल्याला चांगल म्हणण्याची नियत त्यांच्यात नाही,” असा टोलाही नारायण राणेंनी लगावला.
नारायण राणेंनी सुरुवातीलाच शिवसेनेवर जोरदार टीका केली, “दसरा मेळाव्याकडे पत्रकार आणि जनतेच लक्ष होते. शिवसेना सत्तेत की सत्तेबाहेर अशी चर्चा होती. मी आधीही सांगितले होत की, हाकलल्याशिवाय शिवसेना सत्तेबाहेर पडणार नाही. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान,  शरद पवार आदींवर टीका केली. उद्धव यांच कतृत्व काय? नोटाबंदी म्हणजे देशद्रोह म्हणणा-या ठाकरे यांच्या केंद्रातील मंत्र्यांनी लोकसभेत किंवा कॅबिनेटमध्ये साधी नोट अथवा निषेध नोंदविला नाही.”
नोटाबंदी, महागाई यावरून आंदोलन करणाऱ्या शिवसेनेचे मंत्री अभ्यासपूर्ण मुद्दे कधी मांडतात का, “असा सवालही त्यांनी केला.”नोटबंदी, दरवाढ, महागाई, शेतकरी कर्जमाफी आदी विषयात शिवसेनेच्या मंत्री नेत्यांनी कधी अभ्यासपूर्ण मुद्दे मांडले का? कधीच नाही. सत्तेत मंत्रिमंडळात भांडण्याशिवाय कधीच काही केले नाही. लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर येतो म्हणता मग सत्तेत का गेलात. महागाई विरोधात ओरड करणाऱ्या मुंबई महापालिकेने प्रचंड कर लावले. त्यामुळे आज लोकांना इथे घर घेता येत नाही. महापालिकेचे कर आणि महागाईवर बोलतात. भ्रष्टाचारविरोधात बोलणारे ठाकरे महापालिकेच्या भ्रष्टाचारावर चकार शब्द काढत नाही. टक्केवारी घेणा-यांना भ्रष्टाचारावर बोलायचा अधिकार नाही. शिवसेनेतील निष्ठावंत, काम करणाऱ्यांना पद, उमेदवारी मिळत नाहीत. पैसे घेऊन तिकटे विकले जातात. हिंमत असेल तर हा आरोप नाकारून दाखवावा.” असे आव्हान त्यांनी दिले.