नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश निश्‍चित

0
9

मुंबई,दि.02 – नारायण राणे यांनी आजअखेर स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा केल्यानंतर शिवसेना-भाजप युतीच्या राज्य सरकारमध्ये घटकपक्षाचा नेता म्हणून मंत्रिमंडळात त्यांचा समावेश निश्‍चित झाल्याचे मानण्यात येते. मात्र विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता विधान परिषदेवर राणे यांना निवडून आणताना भाजपची दमछाक होणार असल्याने राणे यांच्यासाठी “राष्ट्रवादी’कडून मतांची रसद पुरविण्यासाठी हालचालींना सुरवात झाली.राणे यांना सहा महिन्यांत आमदार करावे लागेल. राज्यात विधानसभेची कुठेही पोटनिवडणूक नसल्याने राणे यांच्या राजीनाम्याने रिक्‍त झालेल्या विधान परिषदेतील पोटनिवडणुकीत त्यांना निवडून आणावे लागेल. विधानसभेत भाजपचे सर्वाधिक 122, शिवसेनेचे 63, कॉंग्रेसचे 42, राष्ट्रवादीचे 41 आणि अन्य 20 असे संख्याबळ आहे. दोन्ही कॉंग्रेसचे विधानसभेतील संख्याबळ 83 आहे. भाजपच्या तुलनेत ते अगदी नगण्य आहे. मात्र, शिवसेनेची राणेविरोधाची भूमिका स्पष्ट असल्याने भाजपसमोरचा पेच कायम राहणार आहे.

स्वतंत्र पक्षाची घोषणा करताना नारायण राणे यांनी शिवसेनेवर तोंडसुख घेतले, मात्र भाजपची ध्येयधोरणे कशी चांगली आहेत, हे सांगताना त्यांच्या राजकारणाची पुढील दिशा स्पष्ट झाली. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्‍वभूमीवर काही दिवसांतच मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहेत. या वेळी महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांच्याप्रमाणे राणे यांचा घटकपक्षाचा नेता म्हणून मंत्रिमंडळात समावेश होईल. त्यांच्याकडे महसूल किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याचा कार्यभार सोपविण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.