जलसाक्षरता प्रसारासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा नवा अभ्यासक्रम

0
30

पुणे,दि.30 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून जलव्यवस्थापन आणि स्वच्छताविषयक पदवी व पदव्युत्तर पदवीचे विविध अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यापीठाकडून जलसाक्षरतेच्या प्रसारासाठी भरीव काम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
नवीन अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाने नेदरलँडमधील ‘आयएचई डेल्फ्ट’ आणि ‘युनिटी नॉलेज’ या संस्थांशी सामंजस्य करार केला असल्याची माहिती कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी दिली आहे. यावेळी ‘आयएचई डेल्फ्ट’चे रेक्टर डॉ. एडी मूर्स, डॉ. नेमान्या ट्रिफूनोव्हीक, ‘युनिटी नॉलेज’च्या संस्थापक संचालिका अनघा पाठक, युनिटी कन्सल्टट्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश पाठक, कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम आदी उपस्थित होते. या कराराच्या माध्यमातून चालु शैक्षणिक वर्षापासून गाळ व्यवस्थापनावर पहिला आॅनलाईन अभ्यासक्रम तसेच एकात्मिक नगर जल व्यवस्थापन या विषयावर पदव्युत्तर पदवी (एम.एसस्सी.) अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहे. ‘एम. एसस्सी.’ हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम असून त्यामध्ये प्रवेशासाठी विज्ञान व अभियांत्रिकीचे पदवीधर पात्र आहेत.
भारतामध्ये स्वच्छ पाण्याची उपलब्धता, जलस्त्रोतांची स्वच्छता आणि देखभाल, जलस्त्रोतांचे नियोजन, उपलब्ध पाण्याचा परिणामकारक वापर आदी बाबींमध्ये अनेक समस्या भेडसावत आहेत. या समस्यांवर मात करण्यासाठी त्याच्याशी निगडित मूलभूत विज्ञान आणि अभियांत्रिकी ज्ञानाची माहिती समाजामध्ये प्रसारीत व्हावी, या उद्देशाने विद्यापीठामध्ये जलसाक्षरतेशी संबंधित नवीन अभ्यासक्रम सुरू होत आहेत. त्याआधारे विद्यार्थ्यांना मर्यादीत कालावधीचे अभ्यासक्रम, संशोधनासाठीच्या संधी, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तपासणी चाचण्या आदी बाबींचा आढावा घेता येईल. जलसाक्षरतेच्या प्रसारासाठीच्या पर्यावरणपुरक कार्यपध्दती, नव्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, समाजोपयोगी संशोधने यासाठी हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरतील, असे डॉ. करमळकर यांनी सांगितले.