नागपूरसह गोंदिया,गडचिरोलीत एसीबीच्या दक्षता सप्ताहाला सुरवात

0
18

नागपूर,दि.31 : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ३१ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह राबविला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी नागपूर विभागातील नागपूर,गोंदिया,गडचिरोली जिल्हयात स्थानिक लाचलुचपत विभागाच्यावतीने शाळा,महाविद्यालय तसेच शासकीय कार्यालयात जाऊन जनजागृती करण्यात आली.नागपूरात महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात आयोजित सभेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक मिलिंद तोतरे यांनी महापालिकेचे कर्मचारी व अधिकाºयांना भ्रष्टाचारविरोधी शपथ दिली. महापालिकेचे उपायुक्त रवींद्र देवतळे, डॉ.रंजना लाडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, सहायक आयुक्त महेश धामेचा प्रामुख्याने उपस्थित होते.भ्रष्टाचार विरोधात जनमोहीम कशी राबविता येईल, तसेच भ्रष्टाचार करणे अथवा लाच मागणे किंवा स्वीकारणे यासंदर्भातील तक्रार कोठे करावयाची याची माहिती तोतरे यांनी दिली.काम करताना कुठलीही तक्रार असेल अथवा भ्रष्टाचाराविरोधी काही तक्रारी करण्यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी मान्यवरांचे स्वागत महेश धामेचा यांनी केले. संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले. यावेळी अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते.

गडचिरोली येथे विभागाच्यावतीने शाळकरी मुलांची रॅली काढून भ्रष्टाचारावर आळा घालण्यांसंबधीची जनजागृती करण्यात आली.तर गोंदिया जिल्हयात शाळा महाविद्ायलायसह देवरी पंचायत समितीच्या कार्यालयात उपअधिक्षक रमाकांत कोकोटे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम घेण्यात आले.