प्रफुल पटेल यांना कोर्टाचा दणका, फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदी झालेली निवड रद्द

0
21

नवी दिल्ली,दि.31(वृत्तसंस्था) : दिल्ली उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांना जोरदार दणका दिला आहे. कोर्टाने त्यांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष पदाची निवड रद्द केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने पटेल यांना दणका देताना माजी मुख्य निवडणुक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांची फुटबॉल महासंघावर प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे.पटेल यांच्याच नेतृत्वाखाली फुटबॉल महासंघाने फिफाच्या 17 वर्षांखालील मुलांच्या विश्वचषकाचे यजमानपद भूषवले होते. याचसोबत भारताने 2019 साली 19 वर्षांखालील मुलांच्या विश्वचषकाच्या यजमानपदासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली होती,त्यात या निकालाचा परिणाम होण्याची चिन्हे वर्तविली जात आहेत.

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाची नव्याने निवडणुकी घेण्यात याव्यात. ही निवडणूक 5 महिन्यांत घेण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत. फुटबॉल महासंघाने घेतलेल्या निवडणुकांमधून राष्ट्रीय क्रीडा संहितेचे उल्लंघन झाल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे.  क्रीडा क्षेत्रात सुधारणांसाठी काम करणारे कार्यकर्ते राहुल मेहरा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती एस. रविंद्र भट आणि न्या. नजमी वाझिरी यांच्या खंडपीठाने प्रफुल पटेल यांची निवड रद्दबातल ठरवली.2008 साली फुटबॉल महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष प्रियरंजन दासमुन्शी यांचे निधन झाले. यानंतर 2009 साली प्रफुल पटेल यांनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. यानंतर आजपर्यंत प्रफुल पटेल फुटबॉल महासंघावर एकमताने निवडून येत आहेत. मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात फुटबॉल महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रफुल पटेल यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.