न्यायाधीशांतर्फे कु आचल गौतमला अविस्मरणीय भेट व भावनिक पत्र

0
10

 

केंद्रशाळा मोहगाव ( तिल्ली ) येथे सरदार पटेल व इंदिरा गांधी यांची जयंती-पुण्यतिथी साजरी

स्थानिक गुन्हे शाखा गोंदियाचे सहा फौजदार चंद्रकांत करपे यांचे चौफेर मार्गदर्शन

अशोक चेपटे ,गोरेगाव,दि.01ः- प्राथमिक शिक्षण घेत असताना, स्वतःची आवड व कला जपत त्याच क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त करून स्वतःला सिद्ध करावे असा संदेश गोंदियाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कमलाकर कोठेकर यांनी जि प केंद्रशाळा मोहगाव ( तिल्ली ) येथील विद्यार्थ्यांना दिला.दिवाळीनिमित्त पोस्टकार्डांचा वापर करून शुभेच्छा कार्ड बनविण्याची कार्यशाळा मोहगाव ( तिल्ली ) येथे दि १४ अॉक्टोबर रोजी घेण्यात आली होती. सदर शुभेच्छा कार्ड जिल्ह्यातील विविध अधिकारी, पदाधिका-यांना पाठविले होते.त्यातील इयत्ता 6 वीची विद्यार्थींनी आचल गौतम हिने न्यायाधीशांना शुभेच्छा कार्ड पाठविले होते.त्या शुभेच्छा संदेशाची दखल घेत चित्रकलेत तिने पारंगत व्हावे म्हणून एक लेखी पत्र, पोस्टर कलर, ब्रश, डिश व आनुषंगिक साहित्य त्यांनी गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेचे ( LCB ) सहायक फौजदार चंद्रकांत करपे व पोलिस शिपाई गौरव गिरी यांच्यासोबत पाठविले.
ते पत्र  ३१ अॉक्टोबरला  देशाचे कणखर नेतृत्व म्हणून ख्याती पावलेले प्रथम गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल, प्रथम महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती-पुण्यतिथी व एकता दिन कार्यक्रमाप्रसंगी देण्यात आले.त्यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक बी सी वाघमारे, विशेष अतिथी गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार चंद्रकांत करपे, पोलिस शिपाई गौरव गिरी,केंद्रप्रमुख आर. आर. अगडे, एच. के. धपाडे उपस्थित होते. यावेळी सरदार पटेल यांच्या जीवनावर आधारित निबंधस्पर्धा तसेच गटागटांत मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. केंद्रप्रमुख अगडे यांनी सरदार पटेल, इंदिरा गांधी यांच्याविषयी महत्त्वाची माहिती विशद केली. सहायक फौजदार करपे यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झालेल्या विविध चळवळी, आंदोलने व उठावांबाबत माहिती दिली व प्राथमिक शाळेतील आठवणींना उजाळा दिला. उपशिक्षक धपाडे यांनी बार्डोली सत्याग्रह व अॉपरेशन ब्लू स्टार याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापक भरतराम वाघमारे यांनी, सुत्रसंचालन अशोक चेपटे यांनी तर आभारप्रदर्शन अनिल मेश्राम यांनी केले.यशस्वीतेसाठी डी. एस. राऊत, कु. एल. के. ठाकरे, तानाजी डावकरे यांनी सहकार्य केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी – विद्यार्थिनी व शिक्षक उपस्थित होते.