७२ शेतकऱ्यांना मिळाले सिंचनासाठी सौर कृषिपंपाचे पाठबळ

0
9

गोंदिया,दि.७ : मागास, दुर्गम, आदिवासी बहुल व जंगलव्याप्त भाग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. या भागात राहणाऱ्या लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. या भागातील शेतकरी कुटूंबांचे जीवनमान उंचावावे यासाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबवित आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी अनेक कृषिविषयक योजना देखील राबविण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी विहीर उपलब्ध आहे, परंतू त्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देणे हे वीज वितरण कंपनीला लागणाऱ्या जास्त खर्चामुळे परवडणारे नाही अशा ५ एकरपेक्षा कमी जमीन क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात ३.५ किंवा ७.५ अश्वशक्ती क्षमतेचे सौर कृषिपंप जिल्ह्यातील ७२ शेतकऱ्यांच्या शेतात लावून दिले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना सौर कृषिपंपाच्या सुविधेमुळे संरक्षीत सिंचनाची व्यवस्था निर्माण होण्यासोबतच उत्पन्न वाढीसाठी देखील मदत झाली आहे.
सौर कृषिपंप योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १४५ शेतकऱ्यांना सौर कृषि पंपाची जोडणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यापैकी ७२ शेतकऱ्यांना जोडणी देण्यात आली आहे. सिंचनासाठी सौर कृषि पंपाच्या उपलब्धतेमुळे या शेतकऱ्यांची शेती बहरली आहे. या योजनेमध्ये केंद्र शासनाचे ३० टक्के वित्तीय अनुदान आहे. राज्य शासनाचे ५ टक्के अनुदान, ६० टक्के रक्कम कर्ज स्वरुपात वित्तीय संस्थेमार्फत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
वीज निर्मिती ही औष्णिक पध्दतीने मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्यामुळे वायू प्रदुषणात भर पडून हवामानावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. वापरण्यात येणारी खनिज संपत्ती ही ठराविक प्रमाणात आहे. दीर्घकालीन विचार करुन अपारंपारीक उर्जा स्त्रोताचा विकास घडवून आणत असतांना सौर उर्जा हा स्त्रोत शाश्वत व निरंतर स्वरुपाचा व महत्वाचा आहे.
सौर कृषि पंपामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. शेतात विहीर असतांना देखील हे शेतकरी वीज कनेक्शनच्या प्रतिक्षेत काही वर्षापासून होते. या योजनेमुळे त्यांना सौर कृषि पंप मिळाले. सिंचनातून समृध्दी आणण्यासाठी सौर कृषिपंपाचे पाठबळ शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण ठरले आहे.