‘जलयुक्त शिवार’ची प्रभावी अंमलबजावणी-अनूप कुमार

0
11

नागपूर,दि.09ः- जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे नागपूर विभागातील २ हजार ७४९ गावांमध्ये झालेल्या विविध उपाययोजनांमुळे १ लाख ५२ हजार ८२१ हेक्टर क्षेत्रात संरक्षित सिंचन करण्यास मदत झाल्याची माहिती विभागीय आयुक्त अनूप कुमार यांनी दिली. अभियानामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीतही लक्षणीय वाढ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विभागात सरासरीच्या ७0 टक्के पाऊस झालेला असल्यामुळे जलयुक्त शिवार अभियान राबविण्याला प्राधान्य दिले आहे. विभागातील ३ हजार ७४३ गावापैकी २ हजार ७४९ गावांची जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड करण्यात आली. यामध्ये २0१५-१६ मध्ये १ हजार 0७७ गावे, २0१६-१७ मध्ये ९१५ गावे, तर २0१७-१८ मध्ये ७५७ गावे निवडण्यात आली आहे. अभियानांतर्गत भूजलाचे पुनर्भरण व जमिनीवर पाण्याची साठवणूक करून संरक्षित सिंचन क्षमता निर्माण करण्यासाठी मातीनाला बांध, दगडीबांध, गॅरियन बंधारे, सीसीटी, भातखचरे, सिमेंट बंधारे आदी कामे घेण्यात येत आहे. मागील दोन वर्षात १ हजार १९२ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या कामामुळे १ हजार ७८९ गावे जल परिपूर्ण झाली. या गावामध्ये ४३ हजार १११ विविध कामे पूर्ण करण्यात आली आहे. अभियानाअंतर्गत १५६.२१ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. यामध्ये गाळाने भरलेले नाले, तसेच विविध तलावांचा समावेश आहे. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शेती या अभियानाअंतर्गत शेतकर्‍यांच्या शेतातही काढलेला गाळ देण्यात आला आहे.
मागील दोन वर्षात झालेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या विविध कामामुळे विभागात २ लक्ष ५0 हजार सस्त्र घनमीटर पाणीसाठा झाला असून त्यामुळे सरासरी १ लाख ५२ हजार ८२१ क्षेत्राला संरक्षित सिंचनाचा लाभ झाला आहे. सन २0१५ व २0१६-१७ या दोन वर्षात विविध उपाययोजनावर ८२९ कोटी ७५ लक्ष रुपये खर्च झाले. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत २0१५-१६ यावर्षात १ हजार ७७ गावात २३ हजार ३९७ कामे पूर्ण झाली आहे. या कामांमुळे १ लक्ष ८९ हजार ८५९ टीएमसी एवढा पाणीसाठा निर्माण झाला असून १ लाख ९ हजार १0८ हेक्टर क्षेत्रात दोन पाणी देण्यासाठी संरक्षित सिंचनाखाली आले आहे. २0१६-१७ यावर्षात ९९५ गावात २२ हजार विविध जलसंधारणाची कामे घेण्यात आली आहे. या कामामुळे ६0 हजार १८५ टीएमसी पाणीसाठा निर्माण झाला असून ४३ हजार ७१३ हेक्टर क्षेत्राला दोन पाणी देण्यासाठी संरक्षित सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे.