२८ नोव्हेंबरला जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळ पाळीतून ठेवा

0
22

गडचिरोली – महात्मा ज्योतीबा फुले यांचा स्मृतीदिन २८ नोव्हेंबर रोजी असून या दिवशी जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळ पाळीतून ठेवण्यात याव्यात, अशी मागणी विविध सामाजिक संघटना व शिक्षक संघटनांनी आज (दि.९) शिक्षणाधिकारी (माध्य.) यांची भेट घेऊन दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदन देताना शिष्टमंडळात डॉ. पंजाराब देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, भारीप बहुजन महासंघाचे प्रदेश निरीक्षक रोहिदास राऊत, बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे विभागीय अध्यक्ष डॉ. नामदेव खोब्रागडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष श्याम भर्रे, ओबीसी युवा महासंघाचे विभागीय अध्यक्ष रूचित वांढरे, शिवराय संघटनेचे परमानंद पुन्नमवार, धनराज टेंभुर्णे, संजय घोटेकर, गणेश सीबडे, सी. के. कांबळे, तुषार वैरागडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, महात्मा ज्योतीबा फुले यांचा स्मृतिदिन शासकीय कार्यालय व शिक्षण संस्थामध्ये साजरा केला जातो. परंतु गेल्या काही वर्षापासून या स्मृतीदिनी विविध सामाजिक संघटनांच्यावतीने मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. या दिवशी पूर्ण दिवस शाळा असल्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना अशा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येत नसून त्यांना अशा विद्धान व्यक्तींच्या मार्गदर्शनापासून वंचित राहावे लागते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळ पाळीतून ठेवण्याता याव्या, अशी मागणी निवेदनातून केली आहे.