माविमचा उपक्रम : विशेष उपजिविका कार्यक्रम फुट पंपाद्वारे शेतीस पाणी देण्याचे प्रात्यक्षिक

0
17

गोंदिया,दि.१० : महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे सालेकसा तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजिविका अभियान राबविले जात आहे. विशेष उपजिविका कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यातील ग्रामीण महिलांच्या उपजिविका वाढविण्याकरीता सुधारित शेळीपालनावर आधारित उपजिविका कार्यक्रम, सुधारित मत्स्यपालनावर आधारित उपजिविका कार्यक्रम व कृषि फलोत्पादन कार्यक्रम राबविल्या जात असून कृषि फलोत्पादन कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकरी महिलांच्या उत्पादन वाढीच्या कार्यक्रमाअंतर्गत शेतमजुरीवर होणारा अधिकचा खर्च कमी करणे तसेच उत्पन्नात भर पडावी, कमी वेळेत अधिक काम पार पाडावे या हेतूने यांत्रिकी शेतीवर भर देण्यासाठी गाव पातळीवर औजार बँकेची संकल्पना मांडण्यात आली व तालुक्यातील खोलगड, कारुटोला व मुंडीपार या गावी सदर औजार बँकेकरीता प्रती गाव ३ लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला.
याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था कमी भांडवलामध्ये व्हावी व त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने नुकतेच मुंडीपार येथे आय.आय.टी.मुंबईचे संशोधन असलेल्या फुट पाणी पंपाचे व ड्रिपचे प्रात्यक्षिक करण्यात आले. या फुट पाणी पंपाद्वारे विहिरीतून, कालव्यातून किंवा नाल्यातून २५ फुटापर्यंतचे पाणी विना विद्युत ओढून वरती ४० फुटापर्यंत याकरीता २ इंचाच्या पाईपच्या सहाय्याने १०० फुटापर्यंत पुढे व १ इंचाच्या पाईपच्या सहाय्याने ३०० फुटापर्यंत पुढे या पंपाद्वारे पाणी शेतीला दिल्या जावू शकते. तसेच विना विद्युत ठिबक सिंचनही केल्या जावू शकते. याकरीता शेतकऱ्याकडे पाण्याची किमान २०० लिटरची टाकी आवश्यक असून याद्वारे जमीन सिंचनाखाली आणता येवू शकेल. याकरीता फुट पाणी पंप ४९५० रुपयांना व ठिबक सिंचन (ड्रीप) एका गुंठ्याकरीता १८०० रुपयांच्या खर्चात मिळू शकेल व अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही हया फुट पाणी पंप व ठिबक सिंचन (ड्रीप) द्वारे कमी भांडवलात जास्त उत्पादन घेवू शकतील अशी माहिती आय.आय.टी.मुंबईचे प्रकल्प अभियंता विकास झा यांनी दिली. या प्रात्यक्षिकास शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
प्रात्यक्षिकाकरीता माविमचे जिल्हा समन्यव अधिकारी सुनील सोसे, आय.आय.टी.मुंबईचे प्रकल्प अभियंता विकास झा, उमेदचे जिल्हा उपजिविका व्यवस्थापक नसीर शेख, माविम सालेकसा तालुका कार्यक्रम व्यवस्थापक अनिल गायकवाड तसेच तालुक्यातील कृषी सखी, गावातील शेतकरी, स्वयंसहायता महिला बचतगटातील महिला, प्रभाग समन्वयक, सहयोगीनी समुदाय पशुधन व्यवस्थापक व समुदाय कृषि व्यवस्थापक उपस्थित होते.