विधान परिषदेतून राणेंची माघार?

0
28

मुंबई,दि.22(वृत्तसंस्था)- माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधान परिषदेतील आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या एका जागेसाठी येत्या 7 डिसेंबरला निवडणूक होत आहे. सत्ताधारी भाजपकडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या नावाची चर्चा होती मात्र, त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता भाजपकडून उमेदवार कोण यावर खल सुरू आहे. प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी आणि पक्षाच्या कोषाध्यक्षा, प्रवक्‍त्या शायना एनसी यांची नावे समोर येत आहेत. मात्र, पक्ष ऐनवेळी या दोघांना डावलून एखादे नवेच नाव समोर आणू शकतो असे बोलले जात आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा देताना काँग्रेस पक्षामुळे मिळालेली विधान परिषदेतील आमदारकीही सोडली होती. या जागेची निवडणूक 7 डिसेंबरला होत असून, या जागेवर पुन्हा निवडून जाण्याचा राणेंचा प्रयत्न होता. मात्र, शिवसेनेने कडवा विरोध केल्याने व काँग्रेस-राष्ट्रवादीची या निवडणुकीसाठी आघाडी होत नसल्याने राणे यांनी थांबणे पसंत केले आहे. विधानसभेत वैभव नाईकांकडून पराभव झाल्यानंतर वांद्रे पोटनिवडणुकीतही राणेंना पराभवाची चव चाखावी लागली होती. आता सेना, राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र येत असल्याचे पाहून राणेंनी आणखी एक पराभव नको म्हणून माघार घेणे पसंत केले आहे. दरम्यान, राणेंनी माघार घेताच भाजपकडून इच्छूकांची नावे समोर येऊ लागली आहेत. यात माधव भांडारी, शायना एनसी, रत्नागिरी भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, माजी आमदार प्रमोद जठार आदींच्या नावांची चर्चा आहे. मात्र, भांडारी व शायना यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते असे भाजपमध्ये चर्चा आहे.