चंद्रकांत पाटील मातोश्रीवर,दीड तास चालली चर्चा

0
7

मुंबई,दि.23(वृ्त्तसंस्था)- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यातील मातोश्रीवरील बैठक संपली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. उद्धव ठाकरे आणि माझा जुना परिचय असल्याने बराच वेळ चर्चा झाली. मात्र बैठकीत राजकीय चर्चा झाली नसल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा यासाठी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी थेट मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांना साकडे घातले. भाजपच्या उमेदवाराला शिवसेनेने समर्थन द्यावे अशी मागणी त्यांनी शिवसेना नेतृत्त्वाकडे केली. यावर तुमचा उमेदवार कोण अशी विचारणा शिवसेनेने केल्याचे समोर येत आहे. याबाबत लवकरच उमेदवाराचे नाव जाहीर करू असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने येत्या 7 डिसेंबर रोजी ही पोटनिवडणूक होत आहे. यासाठी 29 नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करायचे आहेत. या प्रक्रियेसाठी आता केवळ सहा-सात दिवस राहिल्याने या घडामोडीला वेग आला आहे. दरम्यान, भाजपने शिवसेनेशी संपर्क साधल्याने राणे यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. आता भाजपकडून माधव भंडारी, शायना एनसी, प्रसाद लाड आदींची नावे चर्चेत आहेत.शिवसेनेने पाठिंबा दिल्याशिवाय आपला उमेदवार निवडून आणणे कठिण आहे याची जाणीवला भाजपला आहे. त्यामुळेच राणेंनी सुद्धा माघार घेतल्याचे समजते. राणे नसतील तर शिवसेना भाजपला पाठिंबा देईल व काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत कोणत्याही स्थितीत जाणार नाही असा विश्वास मुख्यमंत्र्यांना असल्यानेच त्यांनी चंद्रकांतदादा आणि तावडेंना वाटाघाटीसाठी मातोश्रीवर पाठविले असले तरी माधव भंडारी यांच्या नावावर शिवसेना राजी होईल याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.