विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचा पाठिंबा काँग्रेसला

0
7

नागपूर : विधान परिषदेच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना रोखण्यासाठी काँग्रेस व शिवसेनेने कंबर कसली असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसने आपले पत्ते उघड केले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा संपूर्ण पाठिंबा काँग्रेसच्या उमेदवारालाच असेल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर १२ डिसेंबर रोजी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संयुक्त हल्लाबोल-जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी तटकरे शुक्रवारी नागपुरात आले. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना तटकरे म्हणाले, विधान परिषदेच्या निवडणुकीत गेल्यावेळी तीन जागांसाठी काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी झाली होती. त्यावेळी दोन जागा राष्ट्रवादीला तर नारायण राणे यांची एक जागा काँग्रेसला देण्यात आली होती. आता राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिकामी झालेली ही जागा काँग्रेसच्या कोट्यातील आहे. काँग्रेस देईल त्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस पाठिंबा देणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.अधिवेशनावर राष्ट्रवादीतर्फे ११ डिसेंबर रोजी तर काँग्रेसतर्फे १३ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, समविचारी पक्षांनी एकत्र येत संपूर्ण ताकदीने सरकार विरोधात मोर्चा काढावा, असा विचार मांडला गेला. दोन्ही मोर्चे एकत्र करण्याची विनंती काँग्रेसने केली. ती राष्ट्रवादीने मान्य केली. त्यामुळे आता १२ डिसेंबर रोजी एकच मोर्चा निघणार असून त्यात शेकाप, पीरिपा, समाजवादी पक्ष देखील सहभागी होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे १२ डिसेंबर रोजी ७८ व्या वर्षात पर्दापण करीत आहेत. या वेळी ते शेतकऱ्यांसाठी काढलेल्या मोर्चात सहभागी होऊन आपला वाढदिवस साजरा करणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.