मुख्यमंत्र्याशी चर्चेनंतरच राणेंच्या उमेदवारीबाबत निर्णय-दानवे

0
10

नाशिक,दि.26 : भाजपाच्या मंत्रिपदाच्या आश्वासनानंतर काँग्रेसची साथ सोडून स्वतंत्र पक्षाची स्थापना केल्यानंतर भाजपात अधिकृतरित्या प्रवेश केलेल्या नारायण राणेंना विधान परिषदेची उमेदवारी देण्याबाबतचा पक्षाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही़. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी रविवारी (दि़२६)चर्चा केल्यानंतर सोमवारी (दि़२७) सकाळी अधिकृत उमेदवार घोषीत करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष खासदाररावसाहेब दानवे यांनी सांगून राणेंविषयी योग्यवेळी निर्णय घेणार असल्याचे सांगितल्याने राणेंना भाजपाकडून मिळणा-या उमेदवारीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे़. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, केशव उपाध्ये, सुनील बागूल, सुहास फरांदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते़.
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी (दि़२७) अंतिम मुदत आहे़ त्यामुळे काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर स्वाभिमान पक्षाची स्थापना करून भाजपात प्रवेश करणारे नारायण राणे यांना भाजपा उमेदवारी देणार का? याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे़ पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र बैठकीसाठी नाशिकमध्ये आलेले खा़रावसाहेब दानवे यांना पत्रकारांनी उमेदवारीबाबत विचारले असता त्यांनी भाजपा ही निवडणूक स्वतंत्ररित्या लढवित असून त्यामध्ये पक्षाच्या अधिकृत उमेदवारालाच उमेदवारी दिली जाणार आहे़ राणे यांनी स्वतंत्र पक्षाची स्थापना केल्यामुळे त्यांना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी देण्याचा अद्याप निर्णय झालेला नाही़
भारतीय जनता पक्षाकडून विधानपरिषदेसाठी शायना एऩसी़, माधव भंडारी, केशव उपाध्ये यांच्यासह अन्यचार जणांनी उमेदवारीची मागणी केली आहे़ या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी रात्री चर्चा करून त्यांची यादी केंद्रीय प्रदेश कार्यकारीणीला कळविण्यात येईल़ यानंतर केंद्राने मान्यता दिलेल्या उमेदवाराची अधिकृत घोषणा  केली जाणार असल्याचे दानवे यांनी सांगितले़.