एक रुपयाचा नोटाला 100 वर्ष पुर्ण

0
21

मुंबई,दि.30(वृत्तसंस्था)- एक रुपयाची आता किंमत काय? … काहीच नाही. मात्र, १०० वर्षांपूर्वी याच एका नोटेची किंमत तगडी होती. अशा या मौल्यवान रुपयाच्या नोटेवर अनेक पिढ्यांनी प्रेम केले. ही लाडकी नोट गुरुवारी १०० वर्षे पूर्ण करीत आहे. ३० नोव्हेंबर १९१७ रोजी भारत सरकारने एक रुपयाची पहिली नोट चलनात आणली होती. आतापर्यंत १२५ वेळा एक रुपयांची नवी नोट बाजारात आली आहे.मिंटेज वर्ल्ड या जगातील पहिल्या नाणी आणि रुपयांच्या ऑनलाईन म्युझियमद्वारे ही माहिती देण्यात आली. मुंबईतील कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये जुन्या नाण्यांचे प्रदर्शन या मिंटेज वर्ल्डद्वारे भरवण्यात आले असून गुरुवारी हे प्रदर्शन पाहायला येणा-यांना या १०० वर्ष जुन्या नोटेची प्रतिकृती आणि नवी एक रुपयाची नोट दिली जाणार असल्याची माहितीही देण्यात आली.

एक रुपयांच्या नोटेचा अनोखा इतिहास
भारतावर इंग्रजांचे राज्य असताना त्यांनी देशात प्रथम १८६१ मध्ये नोटा छापण्यास सुरुवात केली. परंतु एक रुपयांची नोट ३० नोव्हेंबर १९१७ रोजी छापून बाजारात आणली. ही नोट इंग्लंडमध्ये छापण्यात आली होती. सर्वात कमी किमतीची भारतातील ही पहिली नोट होती.

> आतापर्यंत १२५ वेळा एक रुपयांची नोट बाजारात आणण्यात आलेली आहे.

> एक रुपयांच्या नोटेत १०० वर्षात आतापर्यंत २८ वेळा बदल करण्यात आले.

> १९४४ मध्ये सी. ई. जोन्स यांची सही असलेली एक रुपयांची नोट २००९ मध्ये झालेल्या लिलावात १,५०,००० रुपयांना विकली होती.

> १९८५ मध्ये एस. वेनिटारमनन यांची सही असलेली एक रुपयांची नोट आणली होती. २१ जानेवारी २०१७ ला झालेल्या लिलावात ही नोट चक्क २,७५,००० रुपयांना विकण्यात आली होती.

> १९७० पर्यंत एक रुपयांची नोट दुबई, बहरीन, मस्कत, ओमान आदि आखाती देशांमध्ये चलन म्हणून वापरली जात असे.

> या एक रुपयांच्या नोटेवरून प्रेरणा घेऊन पोर्तुगीज आणि फ्रान्सने १९१९, १९२४ आणि १९२९ मध्ये अशीच नोट बाजारात आणली होती.

> हैदराबाद संस्थाननेही १९४३ आणि १९४६ मध्ये स्वत:च्या संस्थानमधील स्वतंत्र चलन म्हणून एक रुपयांची नोट तयार केली. मात्र ब्रिटिश सरकारच्या एक रुपयासाठी त्यांना अापल्या चलनातील १८ रुपये माेजावे लागत असत.