कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या-मुख्यमंत्र्यांकडे देवसरकरांची मागणी

0
17

नांदेड दि. 1 -नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामामध्ये अडीच लाख हेक्टरवर कापूस पिकाची लागवड झालेली आहे. जिल्ह्यातील 16 तालुक्यांमध्ये कापसाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. परंतु यावर्षी शेंदरी बोंड आळीच्या प्रादुर्भावामुळे अडीच लाख हेक्टरवर असलेल्या कापूस पिकाला जबर फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून नुकसानग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे उपाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.
कापसाचे पीक 120 दिवसांपर्यंत होईपर्यंत शेंदरी बोंड अळीचे प्रमाण तुरळक प्रमाणात होते, परंतु 120 दिवसानंतर शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नवीन आलेल्या पात्या, फुले व बोंडे पूर्णत: नष्ट झाले आहेत. बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस बोंडातून वेचतासुद्धा येत नाही. परिणामी कापसाचे झाड हिरवे असूनसुद्धा बोंडे मात्र प्रादुर्भावामुळे किडकी निघाली आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बोंड अळीने त्रस्त झालेल्या हजारो शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अर्ज केल्यानंतर तो अर्ज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पाठवला जातो. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सदर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचा पंचनामा करून तो अहवाल संचालक गुण व नियंत्रण कृषी विभाग पुणे यांच्याकडे पाठवायचा आहे. जिल्ह्यात आजवर हजारो तक्रारी आल्यामुळे किती तक्रारदारांच्या शेतावर पंचनामा करण्यासाठी कृषी अधिकारी जाणार आहेत. यात बराचसा वेळ वाया जाणार असून सरकारने सरसकट नुकसानग्रस्तांना मागील काळात सरकारने लाल्या रोग  व सोयाबीनच्या लष्करी अळीच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक नुकसान भरपाई दिली होती. याच धर्तीवर राज्य सरकारने जिल्ह्यातील सर्वच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देऊन आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी भागवत देवसरकर यांनी केली आहे.