स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी लोकांची मानसिकता बदलणे आवश्यक – ना. बबनराव लोणीकर

0
33

मुंबई, दि. 5 : राज्यात राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता अभियानामध्ये आतापर्यंत 15 जिल्हे हागणदारीमुक्त झाले. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या यशस्वितेसाठी लोकांची मानसिकता आणि सवयी बदलणे महत्वाचे असल्याने सर्व प्रशासकीय यंत्रणेने त्यासाठी काम करावे, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी मुंबई येथे केले.
रायगड व सोलापूर जिल्हा हागणदारीमुक्त केल्याबद्दल सोलापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड व रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम.साळुंखे तसेच या दोन्ही जिल्ह्यातील प्रातिनिधिक स्वरुपात ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांचा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज मंत्रालयात पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार प्रसंगी ते बोलत होते.
श्री.लोणीकर पुढे म्हणाले, जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी स्थानिक पातळीवर
गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांचे योगदान महत्वाचे असते. रायगड व सोलापूर
जिल्ह्यातील ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांनी त्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली उत्तम काम केल्यामुळेच जिल्हे हागणदारीमुक्त झाले आहेत. शासकीय स्तरावर अनुदान तसेच शौचालय बांधणीसाठी मदत करता येते परंतु, शौचालय बांधुन त्याचा वापर करणे तसेच स्वच्छता अंगिकारणे यासाठी लोकांची जीवनशैली व मानसिकता बदलणे आवश्यक आहे. यासाठी प्रबोधन व प्रचार करणे महत्वाचे असून प्रबोधनासाठी धर्मगुरु, किर्तनकार यांचे सहाय्य घेऊन लोकांची जीवनशैली बदलण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने प्रयत्न करावेत. आतापर्यंत 15 जिल्हे 198 तालुके व 31 हजार 172 गावे हागणदारीमुक्त झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. भारुड,रायगड जिल्हा परिषदेचे कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड, रायगड जिल्यातील गटविकास अधिकारी नरेंद्र खेडकर, श्रीमती शबाना मोकाशी, ग्रामसेवक टी. एस. दाजीर, एस. एस. पाटील आणि सोलापूर जिल्ह्यातील गटविकास अधिकारी प्रशांत मरोड, महादेव बेळे, ग्रामसेवक ज्योती पाटील, ए.पी. बारस्कर यांचा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. लोणीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी रायगड जिल्ह्यातील व सोलापूर जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित
होते. माध्यम समन्वयक कुमार खेडकर यांनी प्रास्ताविक केले.