मागासवर्गीय तरुणांसाठी शेअर मार्केट प्रशिक्षणाची आखणी करा – ना. राजकुमार बडोले

0
29

मुंबई, दि. 5 : मागासवर्गीय तरुणांना शेअर मार्केट व्यवहारासंबंधी कौशल्य प्राप्त होऊन त्यांना रोजगारक्षम करण्यास तसेच त्यांना स्वयंरोजगार करता यावा, याकरिता कौशल्य विकासाअंतर्गत शेअर मार्केट संबंधी विविध कोर्सेस तयार करावेत, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज येथे दिले.
कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत शेअर मार्केट संबंधातील प्रशिक्षण वर्ग सुरु करण्याबाबत मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत श्री.बडोले बोलत होते. या बैठकीस मुंबई शेअर मार्केटचे अध्यक्ष आशिष चौहाण, सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे, सह सचिव श्री.डींगळे तसेच विविध महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री.बडोले म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मागासवर्गीय तरुणांना पारंपरिक उद्योग व्यवसायाबरोबरच शेअर मार्केट संदर्भातील रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी या तरुणांना म्युचअल फंड, शेअर ब्रोकर्स व शेअर मार्केट संबंधातील विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. यासाठी मुंबई शेअर मार्केटने विविध अभ्यासक्रम तयार करावेत, ग्रामीण मुलांना शेअर मार्केट संदर्भातील प्रशिक्षण घेता यावे यासाठी जिल्हा पातळीवर निवासी कोर्सेस तयार करावेत. असे प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत आवश्यक ती मदत करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.