विविध प्रकारच्या ग्रंथवाचनानेच संस्कृतीचे दर्शन होते – संजय राठोड

0
25

यवतमाळ, दि. 31 : ग्रंथ हेच मानवाचा खरा गुरु आणि मित्र आहे. प्रत्येकाने ग्रंथांच्याबाबतीत हे तत्व आत्मसात केल्यास कोणीही जिवनाच्या कोणत्याही स्तरावर अपयशी होवू शकणार नाही. ग्रंथांमुळेच आपल्याला विविध प्रकारच्या संस्कृतीचे दर्शन होत असते. त्यामुळे प्रत्येकाने ग्रंथवाचनाचा छंद जोपासला पाहिजे, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. पालकमंत्र्यांच्याहस्ते यवतमाळ ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.आरती फुफाटे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, नांदेड येथील जेष्ठ बालसाहित्यिक मालध चुकेवाड, मुख्याधिकारी रविंद्र पांढरे, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, उपशिक्षणाधिकारी एस.आर.चव्हाण, ग्रंथालय संघटनेचे कार्यवाह विनोद देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा ग्रंथपाल नितीन सोनोने, नितीन खर्चे आदी उपस्थित होते. सुरुवातीस दिप प्रज्वलीत करून तसेच ग्रंथदालनाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. वाचनानेच माणूस समृध्द होत असतो. त्यामुळे प्रत्येकाने वाचन केले पाहिजे. हाच उद्देश समोर ठेवून ग्रंथोत्सवाचे आयोजन केले जाते. एकाच ठिकाणी विविध पुस्तके उपलब्ध व्हावी. या पुस्तकांमधून साहित्य, संस्कृती व सांस्कृतिक ओळख निर्माण व्हावी हा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे पुढीलवर्षी मोठ्याप्रमाणावर ग्रंथ व सांस्कृतिक महोत्सव घेता येईल का यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. यावेळी सर्वानी ग्रंथमहोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.फुफाटे यांनी चांगली पुस्तके चांगले विचार देत असतात. त्यामुळे प्रत्येकाने पुस्तके वाचलीच पाहिजे. पुस्तके जिवनात बदल घडवून आणू शकतातत. चांगली दिशा व शिस्त लावण्यासाठी पुस्तकेही मार्गदर्शकाची भुमिका बजावते, असे त्यांनी पुढे बोलतांना सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांचे आवड निर्माण करण्यासाठी ग्रंथोत्सव असल्याचे सांगुन या ग्रंथोत्सवाचा प्रत्येकानी लाभ घ्यावा, असे ते म्हणाले. प्रास्ताविक माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी केले. यावेळी त्यांनी ग्रंथोत्सवामागची भुमिका विशद केली. कार्यक्रमाचे संचलन जेष्ठ साहित्यिक सुरेश गांजरे यांनी केले तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी श्री.शेंडगे यांनी मानले.कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी, साहित्यिक, कवी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. सदर ग्रंथमहोत्सव दिनांक 2 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. या ग्रंथमहोत्सवात पुणे, मुंबई, औरंगाबाद यासह विविध ठिकाणच्या नामवंत प्रकाशनांचे पुस्तकांचे 34 स्टॉल असून वाचकांना पुस्तके पाहण्यासाठी उपलब्ध आहे.