रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा – मुख्यमंत्री

0
21

नागपूर : रस्त्यावरील सर्वाधिक अपघात हे मानवी चुकांमुळे होतात. अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम हा आपल्या दैनंदिन सवयीचा अविभाज्य भाग व्हावा याकरिता युवकांनी अपघात टाळण्यासाठी जनजागृती मोहिमेत पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत राज्य स्तरावर राबविण्यात आलेल्या आंतरविद्यापीठ रस्ता सुरक्षा पुरस्काराचे वितरण श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पोलीस आयुक्त के.के. पाठक, वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालक सुरेंद्र पांडे, आमदार डॉ. मिलिंद माने आदी उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, रस्त्यावरील अपघातामध्ये सरासरी 75 टक्के अपघात मानवी चुकांमुळे होतात. अपघातात जीवित हानी अथवा अपंगत्व आल्यामुळे संपूर्ण परिवाराला या दुर्देवी घटनेबद्दल होणारा त्रास टाळण्यासाठी रस्ता सुरक्षेसंबंधी घ्यावयाच्या खबरदारीबद्दल समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आपले कर्तव्य समजून अपघातग्रस्तांना अपघात झाल्याबरोबर तातडीने संपूर्ण मदत करण्याची भूमिका स्वीकारावी.

अपघातामध्ये विद्यार्थी व युवकांचे प्रमाण जास्त असून गाडी चालविण्याचा थ्रील अनुभवताना अपघात झाल्यास आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा काळ वाया जातो. तसेच अपघातामुळे होणारे दु:ख हे परिवाराचे तसेच समाजाचे दु:ख समजून अपघात होणार नाही याची खबरदारी घेतानाच जनजागृतीसाठी युवकांनी सामूहिक प्रयत्नाच्या माध्यमाने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहनही श्री. फडणवीस यांनी केले.

प्रारंभी राज्यातील 14 विद्यापीठांच्या सुमारे तीन हजार महाविद्यालयांतील 5 लक्ष विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षा अभियानामध्ये सहभागी होऊन विविध उपक्रम राबविले. विद्यापीठ स्तरावर प्रथम आलेल्या भारती विद्यापीठाला 5 लक्ष रुपये, फिरते चषक व स्मृतिचिन्ह श्री. फडणवीस यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. द्वितीय पुरस्कार सावत्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला एक लक्ष रुपये स्मृतिचिन्ह तसेच तृतीय पुरस्कार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडला 75 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला विशेष पुरस्कार तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, कोल्हापूर विद्यापीठातील विविध माध्यमांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी फिरोज खान यांनी रस्ता सुरक्षेसंबंधी विशेष कार्यक्रम व हेमांग जोशी यांनी रस्ता सुरक्षेवर विशेष संदेश तसेच छायाचित्र, कार्टून आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

प्रारंभी अपर पोलीस महासंचालक सुरेंद्र पांडे यांनी रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत राज्यस्तरावर केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. राज्यात 18 ते 30 वयोगटातील वाहनचालकांमध्ये अपघाताचे प्रमाण सर्वाधिक असून अपघात झाल्याबरोबर पहिल्या काही तासात मदत मिळण्यासाठी राज्यातील 23 प्रमुख महामार्गावर 63 महामार्ग पोलीस केंद्र कार्यान्वित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. देशात सर्वाधिक अपघात राज्यात होत असल्यामुळे जनजागृती मोहिमेत विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी रस्ता जागृती मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.