मोदी सरकारच्या जाहिरातबाजीवर 3 वर्षात तब्बल 3 हजार 755 कोटी रुपये खर्च

0
5

नवी दिल्ली,दि.09 : गेल्या साडेतीन वर्षात मोदी सरकारनं केवळ जाहिरातबाजीवर तब्बल 3 हजार 755 कोटी रुपये खर्च केले आहेत. ग्रेटर नोएडामध्ये राहणारे सामाजिक कार्यकर्ते रामवीर तन्वर यांनी त्यासाठी अर्ज केला होता. यातून ही बाब समोर आली आहे.
केंद्राच्या माहितीनुसार, सरकारने इलेक्ट्रॉनिक मीडिया, कम्युनिटी रेडिओ, एसएमएस यावर 1 हजार 656 कोटी रुपये खर्च केले.तर प्रिंट मीडियातील जाहिरातींवर केंद्रानं 1 हजार 698 कोटी रुपये खर्च केले.
त्याशिवाय होर्डिंग्स, पोस्टर्स, बुकलेट, कॅलेंडर्स यावर 399 कोटी रुपये खर्च केले. मोदी सरकारनं जाहिरातींवर खर्च केलेला पैसा हा काही मंत्रालयांच्या वार्षिक बजेटपेक्षा जास्त असल्याचं बोललं जात आहे.कारण, जून 2014 ते ऑगस्ट 2016 अशा दोन वर्षात केंद्रानं नरेंद्र मोदींच्या इमेज मेकओव्हरसाठी 1 हजार 100 कोटी रुपये खर्च केले. तर 2015 या एका वर्षात ‘मन की बात’ कार्यक्रमाची पेपरमध्ये जाहिरात करण्यासाठी साडेआठ कोटी खर्च झाले.
दरम्यान, 2015 मध्ये दिल्लीतल्या आम आदमी पक्षाने आपल्या सरकारच्या कामांची माहिती दिल्लीकरांना देण्यासाठी जाहिरातबाजीवर 529 कोटी रुपये खर्च केले होते. पण  यावरुन काँग्रेस आणि भाजपने आपवर टीकेची झोड उठवली होती.
मात्र, मोदी सरकारनेही तीन वर्षात जाहिरातबाजीवर 3 हजार 755 कोटी रुपयांची उधळण केल्याने, सरकारची जाहिरातबाजी वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत.