चिखलदरा काँग्रेस,पांढककवडा प्रहार,हुपरी भाजप व जिंतूर राष्ट्रवादीच्या ताब्यात

0
16

अमरावती,दि.14 – विदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली असून भाजपला जबर फटका बसला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेने या निवडणुकीत कोणताच रस घेतला नव्हता. त्यामुळे काँग्रेस व भाजपमध्ये थेट लढत झाली. एकुण 17 जागेसाठी 44 उमेदवार रिंगणात होते. नगराध्यक्षपदाची माळ काँग्रेसच्या विजया राजेंद्र सोमवंशी यांच्या गळ्यात पडली. भाजपच्या दुर्गा उर्फ पूजा आशिष चौबे या पराभूत झाल्या. 17 पैकी 12 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला. केवळ 5 जागांवर भाजपला समाधान मानावे लागले. भाजपच्या मंत्री, आमदार व स्थानिक नेत्यांसह कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत प्रचंड जोर लावला होता. परंतु काँग्रेसने या नगरपरिषदेवर आपला दबदबा कायम राखला आहे.

पांढरकवड्यात प्रहारचा विजय

यवतमाळ – पांढरकवडा नगरपालिका निवडणुकीत अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’ युवा शक्ती संघटनेने भाजपा, काँग्रेस आणि शिवसेनेला जोरदार धक्का दिला.  पांढरकवडात नगरपालिकेत १९ पैकी १४ जागांवर अपक्ष आमदार बच्चू उर्फ ओमप्रकाश कडू यांच्या ‘प्रहार’ युवा शक्ती संघटनेचे उमेदवार विजयी झाले.  भाजपाला तीन, तर काँग्रेस, शिवसेनेला प्रत्येकी एक जागेवर समाधान मानावे लागले. नगराध्यक्षपदी प्रहारच्या वैशाली नहाते १२७० मतांनी विजयी झाल्या. विदर्भात अमरावती जिल्ह्याबाहेर पहिल्यांदाच प्रहारचा नगराध्यक्ष व पालिकेत सत्ता आली.

हुपरीत भाजपच्या जयश्री गाट विजयी

हुपरी- नगरपालिका नगराध्यक्षपदासाठीच्या निवडणूकीत  भाजपच्या जयश्री गाट 2130 मतांनी विजयी झाल्या आहेत. तर नगरसेवक पदासाठीच्या 18 जागांपैकी  भाजपने  7, ताराराणी जिल्हा विकास आघाडीने  5, मनसे प्रणित अंबाबाई विकास आघाडीने  2, शिवसेनेने  2 तर अपक्ष  2 अशा जागा मिळविल्या आहेत.नगराध्यक्षपदासाठी गाट यांना 7247 मते मिळाली तर ताराराणी आघाडीच्या उमेदवार सीमा जाधव यांना 5117, शिवसेनेच्या विमल जाधव यांना 1872 तर मनसे प्रणित उमेदवार गीतांजली पाटील यांना 3939 मते मिळाली. यात गाट 2130 मतांनी विजयी झाल्या. प्रभागवार विजयी उमेदवार असे – प्रभाग 1  गणेश वाईंगडे – ताराराणी आघाडी ,अनिता मधाळे – भाजप .प्रभाग 2 -सुरज बेडगे – ताराराणी आघाडी .रेवती पाटील – ताराराणी आघाडी ,प्रभाग 3 -अमर गजरे – मनसे आघाडी ,सुप्रिया पालकर – भाजप,प्रभाग 4 – दौलतराव पाटील – मनसे आघाडी ,ऋतुजा गोंधळी – भाजप .प्रभाग 5 -भरत लठ्ठे – भाजप ,शितल कांबळे – ताराराणी आघाडी ,प्रभाग 6 -जयकुमार माळगे – भाजप ,लक्ष्मी साळोखे – भाजप ,प्रभाग – 7 -रफिक मुल्ला – भाजप ,पूनम पाटील – शिवसेना .प्रभाग – 8-पिंटू मुधाळे – शिवसेना ,माया रावण – ताराराणी आघाडी , प्रभाग – 9 -संदीप वाईंगडे – अपक्ष ,सपना नलवडे – अपक्ष

जिंतूर नगरपालिका पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय

जिंतूर (परभणी ) : नगरपालिकेच्या रिक्त झालेल्या सदस्य पदासाठी निवडणूक झाली होती. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या परवीन तहजीब जानेमियाँ यांनी विजय संपादन केला. निकालानंतर राकाँ कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

जिंतूर नगरपालिकेच्या वॉर्ड क्र.८ मधील रिक्त झालेल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून परवीन तहजीब जानेमियाँ तर भाजप पुरस्कृत उमेदवार शाहदा बेगम शेख शफीक, अपक्ष जकिया बेगम अब्दुल मुकील, गंगूबाई विजयराव गवळी हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. १४ डिसेंबर रोजी या पोटनिवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला. यात राकाँच्या परवीन तहजीब जानेमियाँ यांना १२५१ मते मिळाली असून, त्यांनी ७६९ मतांनी विजय मिळविला. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप पुरस्कृत उमेदवार शाहेदा बेगम शेख शफीक यांना ४५५, जकीया बेगम अ. मुकील यांना ७३, गंगूबाई गवळी (देशमुख) यांना ३३  मते मिळाली. या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

अंबरनाथमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीला यश

ठाणे – अंबरनाथ पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला जबर धक्का बसला आहे. अंबरनाथ पंचायत समितीवर भगवा फडकला आहे. आठ पैकी सहा जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना युतीने जिंकल्या. शिवसेनेला चार तर राष्ट्रवादीला दोन जागांवर विजय मिळाला.  भाजपाने पंचायत समितीमध्ये खातेही उघडले नाही. खरतर राज्यात भाजपा शिवसेनेचा नैसर्गिक मित्र आहे. पण अंबरनाथ पंचायत समितीमध्ये भाजपाला शह देण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन निवडणूक लढवली. त्याचा त्यांना फायदाही झाले. अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चार जागा आहेत. त्यातील दोन जागांवर शिवसेना एका जागेवर भाजपाला विजय मिळाला. अंबरनाथ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या वाडी गटातून शिवसेनेच्या सुवर्णा राऊत विजयी झाल्या.