माजी खासदार अ‍ॅड.वसंतराव मोरेंच्या खात्यात अर्ज न करताच कर्जमाफीची रक्कम

0
6

जळगाव, दि.१६ : माजी खासदार अ‍ॅड.वसंतराव मोरे यांनी कर्जमाफीचा कोणताही अर्ज भरला नसताना त्यांना प्रोत्साहनपर १५ हजार ४८२ रुपयांची कर्जमाफी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खरे लाभार्थी वंचित आहेत व जे निकषात बसत नाही त्यांना कर्जमाफी होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.
माजी खासदार अ‍ॅड.वसंतराव मोरे यांनी टेहू विविध कार्यकारी सोसायटीमधून कर्ज घेतले होते. पण शासनाने कर्जमाफीच्या आदेशात लोकप्रतिनिधींना या कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही असे नमूद केले होते. त्यातच माजी खासदार अ‍ॅड. वसंतराव मोरे हे पेन्शन घेतात म्हणून ते यासाठी पात्र ठरत नव्हते. त्यानुसार त्यांनी कर्जमाफीचा कोणताही अर्ज भरलेला नव्हता. त्यानंतरही त्यांच्या खात्यात कर्जमाफीचा प्रोत्साहनपर १५ हजार ४८२ रुपयांची रक्कम जमा झाली आहे. अ‍ॅड.वसंतराव मोरे यांनी कर्जमाफीची जमा झालेली रक्कम परत करीत कर्जमाफीच्या सावळ्या गोंधळाबाबत माहिती दिली.