राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षण विषय अनिवार्य करा – आ. सतीश चव्हाण

0
7

नागपूर. ( शाहरुख मुलाणी ),दि.19 – राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षण हा विषय अनिवार्य करावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात आ.सतीश चव्हाण यांनी विनोद तावडे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
या निवेदनात आ. सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे की, राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षण हा विषय अनिवार्य केल्यास राज्यातील शालेय अभ्यासक्रमासोबतच कृषी क्षेत्राच्या विकासाबाबत माहितीचे ज्ञान प्राप्त होऊन शेती उत्पादनाचे संशोधन करण्यात विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. त्यासाठी कृषी शिक्षण हा विषय शालेय अभ्यासक्रमात अनिवार्य करणे आवश्यक आहे. तसेच शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षण हा विषय अनिवार्य केल्यास राज्यातील कृषी पदवी, पदव्युत्तर धारकांना कृषी शिक्षक म्हणून नेमणूक मिळण्यास मदत होईल. नुकतीच राज्याच्या मंत्री मंडळाने १२००० शिक्षकांची पदे केंद्रीय परीक्षाव्दारे भरली जाणार असल्याचा निर्णय घेतला असून शालेय अभ्यासक्रमात कृषी शिक्षण हा विषय अनिवार्य करून त्या अभ्यासक्रमासाठी कृषी शिक्षक या पदावर नेमणूक ही केंद्रीय परीक्षाव्दारे करण्याविषयी शासन स्तरावर योग्य तो धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी देखील आ. सतीश चव्हाण यांनी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे.