जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांत भाजपाची सरशी

0
13

मुंबई-राज्यामध्ये नुकत्याच झालेल्या पालघर जिल्हा परिषद – पंचायत समित्यांच्या सर्वसाधारण निवडणुका तसेच रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, गडचिरोली, नाशिक व नागपूर जिल्ह्यांमधील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या विविध जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांत भारतीय जनता पार्टीने एकूण २०३ पैकी सर्वाधिक ६१ जागा जिंकून बाजी मारली आहे. काँग्रेस पक्षाला केवळ दोन जागा मिळाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला सतरा जागांवर समाधान मानावे लागले, असे भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी सांगितले.

राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपाला राज्यात सर्वाधिक जागा तसेच सर्वाधिक मते मिळाली. विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळालेल्या जनादेशाप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीतही भाजपाला यश मिळाले आहे. गेल्या शुक्रवारी जाहीर झालेल्या निवडणूक निकालामध्ये काँग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्यामुळे काँग्रेसमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने आणखी एक पाऊल पडले आहे. स्थापनेपासून गेली पंधरा वर्षे राज्यात सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत केवळ सतरा जागा मिळाल्यामुळे त्या पक्षावरील लोकांचा विधानसभा निवडणुकीतील राग अद्यापही कायम असल्याचे दिसते, असे भांडारी म्हणाले.

त्यांनी सांगितले की, पालघर जिल्हा परिषदेत ५७ पैकी सर्वाधिक २१ जागा जिंकून भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्या जिल्ह्यात पंचायत समित्यांच्या ११४ जागांपैकी सर्वाधिक ३६ जागा भाजपाने जिंकल्या आहेत व आठपैकी चार पंचायत समित्यांमध्ये पक्ष सत्ता काबीज करेल, अशी स्थिती आहे. याखेरीज पोटनिवडणुकीत अहमदनगर जिल्हा परिषदेची एक जागा, कोल्हापूर जिल्ह्यातील एक जागा व गडचिरोली जिल्हा परिषदेची एक जागा तसेच नागपूर जिल्ह्यातील पंचायत समितीची एक जागा भाजपाने जिंकली.

ते म्हणाले की, महाराष्ट्रात बहुतांश काळ राज्य करणाऱ्या काँग्रेस पक्षाला पालघर जिल्हा परिषदेत एक जागा आणि अहमदनगर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत एक जागा अशा दोनच जागा या निवडणुकीत मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या १७ जागांमध्ये पालघर जिल्हा परिषदेच्या चार, पालघर जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या दहा जागा आणि पुणे, सोलापूर व रायगड जिल्ह्यातील प्रत्येकी एक जागा यांचा समावेश आहे. अर्थात या दोन्ही पक्षांवरील राज्यातील मतदारांची नाराजी अद्यापही कायमच असल्याचे स्पष्ट होते.