मी तर बोलणारच, हिंमत असल्यास रोखून दाखवा

0
18

पुणे – माझ्या येथे येण्याने कोणी नाखुश झाले असले तरी त्याला माझा नाईलाज आहे. माझी भाषणे कोणाला भडकाऊ वाटली तरी माझे बोलणे थांबणार नाही, असे मजलिसे इत्तेहादुल मुस्लिमिनचे (एमआयएम) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी निक्षून सांगितले. या वेळची सभा इतरांनी आयोजित केल्याने पोलिस परवानग्या, नोटीस-केस यांना सामोरे गेलो. यापुढची पुण्यातली सभा मात्र ‘एमआयएम’ स्वतः घेईल. कोणीही अडवून दाखवावे, असे आव्हानही त्यांनी शिवसेनेला नाव न घेता दिले.
मूलनिवासी मुस्लिम मंच आणि अॅक्शन कमिटी महाराष्ट्र यांच्या मुस्लिम आरक्षण परिषदेत ते बोलत होते. या सभेला तरुणांनी मोठी गर्दी केली होती. कॉंग्रेसमधून शिवसेनेत परतलेल्या माजी आमदार विनायक निम्हण यांनी ओवेसी यांची सभा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्याची दखल घेत ओवेसी यांनी शिवसेनेला प्रतिआव्हान दिले. ‘नये फकीर को भीक की जल्दी’ असा टोला त्यांनी निम्हणांचे नाव न घेता लगावला. पुढच्या सभेला मी नाही; तर अकबरुद्दीन ओवेसी येतील,असे जाहीर करायला ओवेसी विसरले नाहीत. असदुद्दीन यांचे बंधु अकबरुद्दीन भडक भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत.
शिवसेनेसह अनेक हिंदुत्त्ववाद्यांनी सभेला विरोध केल्याने सभास्थानाला पोलिस छावणीचे रुप आले होते. सभेपूर्वी दोन तास सभास्थानाकडे येणारे सर्व रस्त पोलिसांनी बंद केले होते. ‘एमआयएम’च्या शेकडो कार्यकर्त्यांनीही सभास्थानी संरक्षक कडे उभारले होते. ओवेसींनी चाळीस मिनिटे आवेशपूर्ण भाषण केले.

कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी टीकेचे लक्ष्य केले. पंतप्रधान मोदी स्वतःला प्रधानसेवक म्हणवतात आणि लंडनची वस्त्रे परिधान करतात. मी गरीब आहे. माझे कपडे ‘मेड इन इंडिया’च आहेत, असा चिमटा ओवेसींनी मोदींना काढला. मोदींनी आणखी महागडे कपडे घालावेत, आमची हरकत नाही; पण देशातल्या गरीब मुसलमानांना अंगभर कपडे मिळावेत, असे मोदींना वाटते का, असा सवाल त्यांनी केला. मुसलमानांना एक हाथ मे कुराण, एक हाथ मे कम्प्युटर देण्याची घोषणा मोदींनी प्रचारात केली होती. मोदींचे कुराण आणि कॉम्प्युटर आम्हाला नको. फक्त आरक्षण द्या, असे ओवेसी म्हणाले.

महाराष्ट्रातील ६० टक्के मुसलमान दारिद्र्यरेषेखाली आहेत. मुस्लिम आरक्षण दिले तरच महाराष्ट्र देशातील सर्वोत्तम राज्य होईल. मुसलमानांना धर्माच्या आधारावर नव्हे तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणामुळे आरक्षण हवे आहे. पंधरा वर्षे मुस्लिम मतांची भीक मागून सत्तेत राहिलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीने ते वेळेत दिले असते तर आज आमच्यावर ही मागणी करण्याची वेळ आली नसती, असे ते म्हणाले. मुसलमानांना आरक्षण मिळावे.