12 जानेवारीला सिंदखेडराजातून निघणार पटोलेंची पश्चाताप यात्रा

0
12

गोंदिया,दि.28 –  भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या खासदारकीचा व भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आत्ता माजी खासदार नाना पटोले हे बुलडाणा जिल्ह्यातील राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थली सिंदखेडराजा येथून पश्चाताप यात्रेला 12 जानेवारीपासून सुरवात करणार आहेत.ही यात्रा  सिंदखेडराजा ते भंडारा-गोंदिया राहणार असून साकोली येथे या यात्रेचा भव्य समारोप होण्याची शक्यता आहे.या समारोप यात्रेला विविध पक्षाचे मोठे नेते हजर राहणार असल्याची चर्चा आहे.या यात्रेच्या माध्यमातून पटोले विदर्भात आपली राजकीय ताकद निर्माण करणार असून भविष्यात विदर्भ वेगळा झाल्यास काँग्रेसचे ते मोठे नेते म्हणून नावारुपास येऊ शकतात अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

१२ जानेवारीला जिजाऊंच्या जयंतीदिनी ही यात्रा सिंदखेडराजा येथून निघणार आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यांचा सुमारे चारशे किलोमीटरचा प्रवास करत पश्चात्ताप यात्रा भंडारा-गोंदिया जिल्ह्यात पोहोचणार असून या दोन्ही जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी यात्रेचा जाहीर समारोप होणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यात दाभडी येथे शेतकऱ्यांना भरघोस आश्वासने दिली होती. शेतमालाच्या उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफ्याची तरतूद सुचवणाऱ्या स्वामिनाथन अहवालाची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन मोदींनी दिले होते. मात्र, या आश्वासनाची पूर्तता तर झाली नाहीच; पण शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी चिंताजनक असून आत्महत्या वाढल्या आहेत. त्याचा पश्चात्ताप म्हणून ही यात्रा काढली जाणार आहे.