छत्तीसगडमध्ये शरणागत 21 नक्षलींची नसबंदी उघडली

0
13

जगदलपूर(वृत्तसंस्था),दि.३१ :-छत्तीसगडमध्ये बस्तर पोलिसांसमोर शरणागती पत्करलेल्या नक्षलवाद्यांनी आपली नसबंदीची शस्त्रक्रिया पुन्हा उघडली. यासाठी “रिव्हर्स वॅसेक्टॉमी’ शस्त्रक्रिया करवून घेतली. यामुळे पाच नक्षलवाद्यांच्या घरात पुन्हा पाळणे हलले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची नावे देता आलेली नाहीत. माता-पिता झालेल्या या माजी नक्षलवाद्यांची वये २२ ते २९ वर्षांच्या दरम्यानची आहेत. सर्व शस्त्रक्रिया सरकारी खर्चाने करण्यात आल्या.रिव्हर्स व्हॅसेक्टॉमी शस्त्रक्रिया करवून घेण्याच्या संदर्भात कांकेर व बीजापूर जिल्हा आघाडीवर आहे. दोन्ही जिल्ह्यात नुकतेच सहा-सहा नक्षलवाद्यांचे रिव्हर्स वॅसेक्टॉमी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. अशा प्रकारे, नारायणपूर येथे तीन शरणागत नक्षलवाद्यांनी नसबंदी उघडली. शिवाय, बस्तर, कोंडागाव, सुकमासह अन्य जिल्ह्यात सहा माजी नक्षलवाद्यांची नसबंदी उघडण्यात आली.

बस्तरचे पोलिस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा यांनी वृत्तसंस्थेला  सांगितले की, आतापर्यंत शरणागती पत्करलेल्या नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना घर-नौकरी आदी सोयी देण्यात येत होत्या. प्रथमच शरणागती पत्करलेले नक्षलवादी रिव्हर्स वॅसेक्टॉमी शस्त्रक्रियेनंतर माता-पिता झाले आहेत. बस्तर येथे काही वर्षांपूर्वी एक हजारांहून अधिक नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे. यातील निम्म्याहून अधिक नक्षलवाद्यांनी सांगितले, आम्ही कौटुंबिक सुखाला पारखे झालेलो आहोत. हे सुख मिळावे म्हणूनच शरणागती पत्करत आहोत.सिन्हा म्हणाले, २००१ मध्ये मी पोलिस अधीक्षक होतो. तेव्हा शरणागत आलेल्या एका नक्षलवाद्याने मला सांगितले, नक्षलवाद्यांनी माझी नसबंदी केलेली होती. त्यामुळे मी खूप परेशान होतो. मला माझी लेकरेबाळे हवी आहेत. यासाठी शरणागती पत्करण्यास तयार झालो. त्यावेळी शरणागत येण्यासाठी काही धोरण आखलेले नव्हते. आम्ही सरकारकडे विनंती केली. तेव्हा आम्हाला विशेष परवानगी देण्यात आली.