भिमा कोरेगाव येथील घटना पुर्वनियोजित, हल्ल्याची न्यायालयीन चौकशी व्हावीः डॉ. राजू वाघमारे

0
6

मुंबई, दि.१ ः- पुणे जिल्ह्यातील भिमा कोरेगाव येथे शौर्य दिनानिमित्त्त आयोजित कार्यक्रमात आंबेडकरी अनुयायांवर पुर्वनियोजितपणे करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून या हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसच्या अनुसुचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी केली आहे.

पुढे बोलताना डॉ. राजू वाघमारे म्हणाले की भिमा कोरेगाव शौर्य लढ्याला यंदा २०० वर्षे पुर्ण होत आहेत. त्यामुळे यावर्षी लाखोंच्या संख्येने लोक या ठिकाणी येणार आहेत याची पूर्ण कल्पना सरकारला होती. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात आरएसएसशी संबंधीत लोकांकडून तणाव निर्माण करण्याचे काम सुरु होते. काही दिवसापुर्वी झालेल्या वादामुळे भिमा कोरेगावचे वातावरण तणावपूर्ण असताना सरकारने चोख पोलिस बंदोबस्त व सुरक्षा पुरविणे आवश्यक होते. परंतु पोलिसांनी पुरेशी सुरक्षाव्यवस्था न ठेवल्याने ही घटना घडली असे डॉ. वाघमारे म्हणाले.

आज झालेल्या घटनेत पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली, त्यामुळे पोलीसांसमोरच दंगेखोराकडून वाहनांची तोडफोड करीत आंबेडकरी महिला, मुले व ज्येष्ठ नागरिकांना मारहाण करण्यात आली. ही मारहाण सुरु असताना पोलीसांनी या दंगेखोरांना पांगविण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. याबाबत पोलीस महासंचालकांना कायदा सुव्यवस्था यांनी फोन करुन देखील त्यांनी मिटींगमध्ये असल्याचे कारण सांगत फोन घेतला नाही. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांची भूमिका संशयाची होती घटना घडून गेल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावरुन पोलीस यंत्रणा व प्रशासन हे आरएसएसच्या इशाऱ्यावर काम करते आहे हे स्पष्ट झाले असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी डॉ. वाघमारे यांनी केली आहे.