‘सुखदा-शुभदा’तील नेत्यांची अनधिकृत बांधकामं पालिका 10 फेब्रुवारीला पाडणार

0
10

मुंबई- मुंबईतील वरळी येथील सुखदा आणि शुभदा या उच्चाभ्रू सोसायटीतील अनधिकृत बांधकाम येत्या 10 फेब्रुवारीला मुंबई महापालिका पाडणार आहे. या सोसायटीत अनेक राजकीय नेत्यांनी अनधिकृतरीत्या ऑफिसे थाटली आहेत. गाळ्यांमध्येही वाढीव बांधकाम करून आपली दुकानेही थाटली आहेत. फ्लॅटमध्ये अनेक बदल केले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीसह सत्ताधारी भाजप-सेनेच्या अनेक बड्या नेत्यांनी या सोसायटीत घरे घेतली आहेत.
राजकीय नेत्यांनी वाढवलेली अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी मुंबई महापालिकेने त्यांना मागील एक-दीड वर्षापासून सतत नोटिसा दिल्या आहेत. नोटिसा बजावल्या तरीदेखील त्यांनी पालिकेने सांगितल्याप्रमाणे बदल केले नाहीत किंवा बांधकाम हटविले नाही. त्यामुळे शेवटी त्यांच्या घरांवर आणि गाळ्यांवर हातोडा पडणारच होता. आता त्यामुळेच, मुंबई महापालिकेने स्व:तच ही बांधकामे पाडण्याचा निर्णय घेतला आहे. रणजीत देशमुख, अनिल देशमुख, पतंगराव कदम, अजित पवार, माणिकराव ठाकरे, अण्णा डांगे, प्रतापसिंह मोहिते-पाटील यांनी अनधिकृतरीत्या वाढीव बांधकाम केल्याचे पालिकेला आढळून आले आहे.

माजी मंत्री पतंगराव कदम यांची तर संपूर्ण व्यायामशाळाच अनधिकृत आहे. पतंगराव कदम यांनी ‘शुभदा’ सोसायटीत तीन गाळे घेतले आहेत परंतु ते एकत्र करून या ठिकाणी इसलॅण्ड नावाने जिम्नॅशियमच थाटले आहे. या इमारतीत जिम्नॅशियम उभारले तेदेखील तीन गाळे एकत्र करून. हे अनधिकृत असून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेने कदम यांना नोटीस बजावली आहे. तरीदेखील कदम यांनी जिम्नॅशियम सुरूच ठेवले आहे. विशेष म्हणजे कदम हे या सोसायटीचे सेक्रेटरी आहेत. जेव्हा हातोडा पडेल तेव्हा पाहू, असे बेजबाबदार वक्तव्य कदम यांनी काही महिन्यांपूर्वी दिले होते.
दरम्यान, सुखदा-शुभदामधील इतर रहिवाशी नागरिकांनी मात्र मुंबई पालिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. राजकीय नेत्यांच्या कारनाम्यांमुळे आमची सोसायटी बदनाम झाल्याची रहिवाशांचे म्हणणे आहे. अनाधिकृत बांधकामे राजकारण्यांची आहेत. ती बिनधास्त तोडा आम्ही पालिकेसोबत आहोत, अशा शब्दांत ‘सुखदा-शुभदा’ सोसायटीच्या रहिवाशांनी अनधिकृत बांधकामे केलेल्या नेत्यांविरोधात संताप व्यक्त केला आहे. पालिकेने पोलिस बंदोबस्त न घेता अनधिकृत बांधकामे तोडण्याचे काम सुरू केले तरीदेखील रहिवासी त्यांना अडवणार नाहीत, असे काही रहिवाशांनी सांगितले. नेत्यांनी इथे गाळे घेतले आहेत की घरे याबद्दल आम्हाला काहीही माहीत नाही. तसेच त्यांची माहिती करून घेण्यात कसलाही रस नसल्याचे काहींनी सांगितले. महापालिकेने यापूर्वीच कारवाई करायला हवी होती. आम्हीही सोसायटीत गाळे मागितले होते. योग्य भावही द्यायला तयार होतो, पण आम्हाला गाळे मिळाले नाहीत ते नेत्यांना मिळाले. आम्ही कधीही नियमांचे उल्लंघन केले नाही. नेत्यांनी नियमांचे उल्लंघन केले तरीही त्यांच्यावर इतक्या उशिरा कारवाई होत आहे. ती आधीच व्हायला पाहिजे होती. त्यांना धडा शिकवलाच पाहिजे अशा शब्दांत रहिवाशांनी आपला संताप व्यक्त केला.