मालमत्ता कर वाढीच्या विरोधात काँग्रेसचा हल्लाबोल

0
13

नागपूर दि.०४ः: शहरातील मालमत्तांचा सर्वे करण्याची जबाबदारी असलेल्या सायबरटेक कंपनीने चुकीचे व नियबाह्य सर्वेक्षण केले आहे. आजवर १२०० रुपये मालमत्ता कर भरणाऱ्यांना ३२ हजारांच्या डिमांड पाठविल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर दरोडा टाकू न त्यांना वेठिस धरणाऱ्या सायबरटेक कंपनीचा कंत्राट रद्द करावा. मालमत्ताधारकांना पाठविण्यात आलेल्या अव्वाच्यासव्वा डिमांड रद्द करून सुधारित डिमांड पाठविण्यात याव्या. यासाठी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात गुुरुवारी महापालिका मुख्यालयावर हल्लाबोल आंदोलन करून जोरदार नारेबाजी करण्यात आली.सभागृहाच्या निर्णयानुसार दुपटीपेक्षा अधिक कर आकारला जाणार नाही. असे निर्देश कर व कर आकारणी विभागाला देण्यात यावे. सायबरटेक कंपनीला यापुढे सर्वेक्षणाचे बील देण्यात येऊ नये. अशी मागणी विकास ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने अपर आयुक्त रविंद्र कुंभारे यांच्याकडे केली.
करारानुसार सर्वेक्षणात एक घर एक युनीट गृहीत न धरता एका घराचे अनेक युनीट दर्शविण्यात आले आहे. भाडेकरू नसतानाही भाडेकरू दर्शविल्याने करामध्ये प्रचंड वाढ झाल्याने विकास ठाकरे यांनी निदर्शनास आणले. जुन्या इमारतीवर व बांधकामात बदल झालेला नसेल तर दुपटीपेक्षा अधिक कर आकारला जाणार नाही. मिळालेल्या डिमांड चुकीच्या असेल तर त्यावर आक्षेप नोंदविल्यास कर कमी केला जाईल. अशी ग्वाही कुंभारे यांनी शिष्टमंडळाला दिली.आंदोलनात अ‍ॅड. अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार, नगरसेव संदीप सहारे, हरीष ग्वालबंशी, रमेश पुणेकर, भावना लोणारे, प्रशांत धवड, गुड्डू तिवारी, जयंत लुटे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते सहभागी झाले होते.