रा. स्व. संघात नेतृत्त्वाच्या पदांवर किती महिला आहेत? राहुल गांधींची संघ, भाजपावर टीका

0
24

शिलाँग,दि.31(वृत्तसंस्था)- राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांचे स्थान काय आहे असा प्रश्न काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. मेघालयमध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्यावेळेस केलेल्या भाषणात रा.स्व. संघात नेतृत्त्वाच्या विविध पदांवर किती महिला आहेत असा प्रश्न त्यांनी आज विचारला.
मेघालयातील भाषणामध्ये भाजपा आणि संघावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, “संघाच्या विचारप्रवाहाविरोधात आम्ही देशभर लढत आहोत. भाजपा आणि संघ देशभरात विशेषतः ईशान्य भारतामध्ये संस्कृती, भाषा आणि जिवनपद्धतीचे महत्त्व कमी करत आहेत.” ईशान्य भारतातील लोकांना उद्देशून ते म्हणाले, “आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दल, भाषा आणि संस्कृतीबद्दल अभिमान असला पाहिजे. तुमच्या संस्कृती आणि विचारपद्धतीचे संरक्षण करण्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर आहोत.”रा. स्व. संघात महिलांचे स्थान या विषयावर पुन्हा टीका करताना राहुल गांधी म्हणाले, “संघामधील विविध नेतेपदांवर किती महिला नेमल्या गेल्या आहेत याबाबत कोणाला माहिती आहे का?  जर तुम्ही महात्मा गांधींचा फोटो पाहिलात तर त्यांच्या दोन्ही बाजूस महिला उभ्या असल्याचे तुम्हाला दिसेल पण तुम्ही मोहन भागवत यांचा फोटो पाहिलात तर ते एकटेच दिसतील किंवा त्यांच्या आजूबाजूस पुरुषच दिसतील.”