पीडब्लूडी विभागाच्या लाचखोर कार्य.अभियंत्यासह लिपिकास पोलीस कोठडी

0
10

नाशिक,दि.02 : विद्युत अभियंता नोंदणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडे अर्ज केलेल्या सुशिक्षित बेजरोगार युवकाकडे वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेले कार्यकारी अभियंता रामदास सोन्याबापू कांबळे व मुख्य लिपीक आप्पा शिवराम केदार या दोघांनाही जिल्हा व सत्र न्यायालयाने ५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि़.१) या दोघांनाही अटक केली होती़
सुशिक्षित बेरोजगार युवकाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे विद्युत विभागाकडे विद्युत अभियंता नोंदणीसाठी अर्ज केला होता़ या अर्जासंदर्भात तक्रारदार हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास कांबळे यांना जाऊन भेटले असता त्यांनी नोंदणीसाठी पैसे द्यावे लागतील असे सांगून मुख्य लिपिक आप्पार केंदार यांना भेटण्यास सांगितले़ यावरून हा युवक मुख्य लिपिक आप्पा केदार यांना भेटण्यास सांगितले असता त्यांनी या नोंदणीसाठी २० हजार रुपये लाचेची मागणी केली़
तक्रारदार युवकाने होकार दर्शवून कार्यालयातून काढता पाय घेतला; मात्र थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले. वीस हजार रुपयांची लाचेची मागणी अधिकारी-कर्मचा-यांकडून केली जात असल्याची तक्रार दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पथकाने गुरुवारी(दि़.१) सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या आवारात सापळा रचला.
तक्रारदार युवक वीस हजार रुपयांची रक्कम देण्यासाठी कांबळे यांच्याकडे गेला असता कांबळे याने ती रक्कम केदारकडे देण्यास सांगून प्रोत्साहन दिल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने म्हटले आहे. या युवकाकडून लाचेची २० हजार हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच या पथकाने अधिकारी कांबळे व लिपीक केदार या दोघांना अटक केली़ या दोघांनाही शुक्रवारी (दि़२) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली़.