विजेच्या धक्क्याने अस्वलाचा मृत्यू

0
12

भंडारा,दि.03ः-शेतपिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकर्‍यांनी लावलेल्या जिवंत विद्युत तारांच्या स्पर्शाने एका अस्वलाचा हकनाक बळी गेला. ही घटना कोका अभयारण्याला लागून असलेल्या डोडमाझरी येथे घडली. वन विभागाने याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
चेतन फुलसुंगे व शेखर शिंगाडे रा. डोडमाझरी अशी आरोपींची नावे आहेत. शेखर शिंगाडे याच्या शेताला लागून चेतन फुलसुंगे याचे शेत आहे. कोका अभयारण्य व प्रादेशिक जंगलाची सीमा या शेताला लागूनच आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा मुक्तसंचार असतो. त्यातून शेतपिकांची हानी होत असते. त्यामुळे वन्यप्राणी शेतात येऊ नये म्हणून या शेतकर्‍यांनी शेताच्या भोवताल तारेचे कुंपन लावून त्यात विद्युत करंट लावला. २८ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास विद्युत करंटमुळे एका अस्वलाचा मृत्यू झाला. सकाळी ही घटना उजेडात येताच दोन्ही शेतकर्‍यांनी रात्रहोण्याची वाट पाहीली. २९ जानेवारी रोजी रात्री अस्वलाचा मृतदेह सायकलवर मांडून नेत असताना कोका अभयारण्याच्या गस्ती पथकाने दोघांनाही पकडले. भंडार्‍याचे सहाय्यक वनसंरक्षक आर.डी. चोपकर, वनपरिक्षेत्र अधिकारी निलय भोगे व कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. ३0 जानेवारी रोजी अस्वलाचे शवविच्छेदन करून गडेगाव आगारात जाळण्यात आले. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी निलय भोगे करीत आहेत.