‘राष्ट्रवादी’च्या नगरसेवकाला नऊ महिन्यांचा कारावास

0
9

 नागपूर,दि.03 : धनादेश न वटल्याने नागपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दुनेश्‍वर पेठे यांना न्यायालयाने तब्बल 41 लाख रुपयांचा दंड ठोठावला; तसेच नऊ महिन्यांच्या कारावासाची शिक्षाही सुनावली आहे. नगरसेवकावर एवढ्या मोठ्या रकमेचा दंड ठोठावण्याची नागपूरची ही पहिलीच घटना आहे.पेठे हे नागपूर महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव नगरसेवक आहे. ते दुसऱ्यांदा महापालिकेत निवडून आले असून, काही काळ ते महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेतेसुद्धा होते. ‘पेठे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स’चे ते मालक आहेत. त्यांच्याकडून दुर्गेश पटेल व हितेश पटेल यांनी फ्लॅट घेण्यासाठी 2007 मध्ये करार केला होता. यासाठी पटेल बंधूंनी पेठे यांना 40 लाख रुपये दिले होते. काही कारणांनी हा करार मोडीत निघाला. त्यामुळे पटेल यांनी 40 लाख रुपये परत करण्याची मागणी केली. पेठे यांनी पटेल बंधूंना प्रत्येकी 20 लाख रुपयांचे दोन धनादेश दिले होते.हे दोन्ही धनादेश वटले नाहीत. यामुळे पटेल बंधूंनी पेठेंविरोधात पोलिसांत क्रार दाखल केली. नागपुरातील प्रथमश्रेणी न्यायालयाने पेठे यांना दोषी मानले असून, पटेल बंधूंना द्यावयाची संपूर्ण रक्कम द्यावी; तसेच यासाठी नऊ महिन्यांच्या कारावासाची शिक्षाही न्यायालयाने त्यांना सुनावली आहे. या निर्णयाला आव्हान देण्यासाठी पेठे यांना एक महिन्याची मुदत दिली आहे.