लग्नाची गळ घातल्याने केली युवतीची हत्या, आरोपीस अटक

0
8

कुरखेडा,दि.३: नजीकच्या डिप्राटोला येथील जंगलात हत्या करण्यात आलेल्या युवतीची ओळख पटली असून, आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पिलेश्वरी उर्फ पिंकी जयसिंग कुमरे(२५)रा.भटगाव, ता.कोरची, असे मृत युवतीचे, तर प्रदीप बालसिंग हारामी(२४) रा.अंतरगाव, ता.कोरची असे आरोपीचे नाव आहे.

काल(ता.२) डिप्राटोला गावाशेजारच्या जंगलात एका युवतीचा मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ माजली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे व सहायक पोलिस निरीक्षक गजानन पडळकर यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर श्री.पडळकर यांनी तपासचक्रे वेगाने फिरवून २४ तासांच्या आत आरोपीस अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत युवती पिलेश्वरी कुमरे व आरोपी प्रदीप हारामी या दोघांची गावे शेजारीच आहेत. पिलेश्वरीने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला होता व ती पुण्यातील एका हॉटेलमध्ये नोकरी करीत होती. प्रदीप हारामी हा आरमोरी येथील म.गांधी महाविद्यालयात एम.ए. प्रथम वर्षाला शिकत होता. तेथे तो भाड्याच्या खोलीत वास्तव्य करीत होता. मागील पाच-सहा वर्षांपासून पिलेश्वरी व प्रदीप यांच्यात प्रेमसंबंध होते.

२ फेब्रुवारीला कोटगूल येथे मंडई उत्सव असल्याने पिलेश्वरीने गावी येण्याचे ठरविले. मंडईनिमित्त वर्षभरानंतर आई-वडिलांची भेट होईल म्हणून ती ३० जानेवारीला संध्याकाळी पुण्याहून निघाली. ३१ जानेवारीला आरमोरी येथे पोहचून तिने प्रदीपची भेट घेतली. दुसऱ्या दिवशी १ फेब्रुवारीला दोघेही मोटारसायकलने कुरखेड्याला गेले. प्रेमसंबंध असल्याने पिलेश्वरीने प्रदीपला लग्नाची गळ घातली. प्रदीप तिला नकार देऊ लागला. याच दिवशी संध्याकाळी दोघेही डिप्राटोला येथील जंगलात गेले. तेथे पुन्हा पिलेश्वरीने लग्नाचा आग्रह केला. मात्र, प्रदीपने तिचा आग्रह धुडकावून लावत तीक्ष्ण अवजाराने गळा चिरुन तिची हत्या केली आणि तो घटनास्थळावरुन पसार झाला. दरम्यान काल सकाळी डिप्राटोलाच्या जंगलात युवतीचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ माजली. आरोपीचा शोध घेणे हे पोलिसांपुढे आव्हानच होते. परंतु उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गजानन पडळकर यांनी तपासचक्रे वेगाने फिरवून आज सकाळी आरोपी प्रदीप हारामी यास नवरगाव येथील त्याच्या घरुन अटक केली. प्रेमप्रकरण व लग्नाची गळ घातल्याने आपण पिलेश्वरीची हत्या केल्याची कबुली प्रदीपने दिली. पोलिसांनी त्याच्यावर भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. २४ तासांच्या आत आरोपीचा शोध घेऊन त्यास अटक केल्याबद्दल सहायक पोलिस निरीक्षक गजानन पडळकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतूक केले जात आहे.