एकनाथ खडसे बदनामी प्रकरण: अंजली दमानियांना तत्काळ अटक करण्याचे कोर्टाचे आदेश

0
12

मुंबई,दि. 8- भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर विविध आरोप करुन बदनामी करणा-या आपच्या माजी नेत्या अंजली दमानिया यांच्याविरोधात रावेर न्यायालयाचे न्या. डी. जी. मालविय यांनी आज पकड वॉरंट जारी केले. या वॉरंटमधून कोर्टाने मुंबईतील सांताक्रूज पोलिसांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, कोर्टाच्या या आदेशामुळे अंजली दमानिया यांना आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

जावायाची लिमोझीन कार, भोसरी भूखंड प्रकरण, अपसंपदा गोळा करणे, कार्यकर्त्याचे लाच प्रकरण आदी विषयांवर बेछूट आरोप अंजली दमानिया यांनी जळगावात येवून केल्याबद्दल भाजपचे रावेर तालुकाध्यक्ष सुनील पाटील यांनी खडसेंची बदनामी केल्याचा खटला (क्रमांक 416) कलम (500 व 501) नुसार भरला आहे. या खटल्याचे रितसर समन्स प्राप्त होवूनही अंजली दमानिया कोर्टात हजर होत नव्हत्या. म्हणून आज अखेर त्यांच्या विरोधात न्यायाधिशांनी पकड वॉरंट काढले. या खटल्यात फिर्यादीतर्फे ॲड. चंद्रजित पाटील व ॲड. तुषार माळी काम पाहत आहेत.

जून 2016 मध्ये एकनाथ खडसे यांची अचानक चार-पाच प्रकरणे बाहेर आली होती. त्यामागे काही षडयंत्र असल्याचे बोलले गेले. खडसेंची या प्रकरणी मोठ्या प्रमाणात मिडिया ट्रायल झाली. अखेर एकनाथ खडसेंना मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते. मात्र, त्यांच्यावरील आरोप अद्याप एकही स्पष्ट झालेला नाही.दरम्यान, आपली बदनामी होत असल्याने खडसेंनी आपल्या समर्थकांमार्फत रावेर कोर्टात अब्रूनुकसानीचा दावा ठोकला होता. मात्र, या खटल्यासाठी अंजली दमानिया यांनी एकदाही हजेरी लावली नाही. त्यामुळे कोर्टाने अखेर पकड वॉरंट आज काढले.एकनाथ खडसे यांनी या काळात अंजली दमानिया यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ‘ही बाई कोणाच्या तरी सांगण्यावरून व आदेशावरून पैसे व सुपारी घेऊन एखाद्याला आयुष्यातून उठवत आहे’ असा गंभीर आरोप खडसेंनी केला होता. यानंतर अंजली दमानिया यांनीही खडसेंविरोधात कोर्टात जाण्याची धमकी दिली होती. मात्र, दमानिया यांनी काहीही पाऊल उचलले नाही.