जि.प. प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करा-तालुका काँग्रेस

0
18

अर्जुनी मोरगाव,दि.09ः-कमी पटसंख्येचा आधार घेऊन वर्तमान राज्य शासनाने महाराष्ट्रातील अनेक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंद करण्याचा शासन निर्णय घेतला असून 0 ते १0 पटसंख्या असलेल्या अनेक शाळा बंद केल्या असून अजून १0 ते ३0 पटसंख्या असलेल्या शाळाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याने हा निर्णय अत्यंत दुर्भाग्यपूर्ण असून, गाव खेड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित करण्याचा शासनाचा डाव आहे. तेव्हा शासनाने हा निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणी अर्जुनी मोरगाव तालुका काँग्रेस कमेटीने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.
तालुका काँग्रेस कमेटीने पत्रकार परिषदेमध्ये दिलेल्या माहितीनुसार गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती अर्जुनी मोरगाव यांचे ३ फेब्रुवारीला शिक्षणाधिकारी (प्राथ.) जि.प. गोंदिया यांना दिलेल्या पत्राप्रमाणे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 0 ते १0 पटसंख्या असलेल्या जि.प. प्राथमिक शाळा जुनेवाणी पटसंख्या ९, डोंगरगाव ५, जरुघाटा ८, आदिवासीटोली ७, खोळदा ८ व जांभळी पोर्ला या शाळा कायमच्या बंद करण्यात आल्या असून सदर शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना जवळच्या शाळेत समायोजित करण्यात आले आहे. सदर निर्णयामुळे आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण घेणे दुरापास्त झाले आहे. संबंधित सर्व शाळांमध्ये शिक्षण घेत असलेली सर्व विद्यार्थी ६ ते १0 वयोगटातील असून, दुर्गम भागामध्ये दोन ते तीन किलोमिटर पायी ये-जा करणे हानिकारक आहे. हाच निर्णय शैक्षणिक सत्र संपल्यानंतर पालकांना पूर्वसूचना देऊन बंद करण्याचा निर्णय घेणे योग्य ठरले असते.
पूर्व शासनाचा शक्तीच्या शिक्षणाचा अधिनियम २00९ व शिक्षणाचा हक्क २0११ च्या तरतुदीनुसार गाव तिथे शाळा सुरू करण्यात आलेल्या होत्या. परंतु वर्तमान शासनाच्या निर्णयाने पुढच्या सत्रात तालुक्यातील ३0 पटसंख्येच्या खाली असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा एकूण ३२ शाळा बंद होणार आहेत. त्यामध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यातील १0 ते ३0 पटसंख्या असलेल्या पांढरवाणी माल पटसंख्या २८, खोली २0, डोंगरगाव (कवठा) २0, रांझीटोला २१, धाबेटेकडी (पवनी) २६, जब्बारखेडा १७, भसबोळण १२, गार्डनपूर २८, खोकरी २३, उमरपायली १६, पुष्पनगर अ २१, पुष्पनगर ब २४, कढोली २७, सुरबन २३, बंध्या महागाव ३0, अरततोंडी (कोरंभी) १५, करडगाव (बोळदे) १२, राजीवनगर (ताडगाव) ३0, इसापूर १६, येरंडी (देवी) २३, विहीरगाव १७, अर्जुनी मोरगाव क्रमांक १- २६, इंजोरी २७, बिडटोला १८, भूरसीटोला १७, शिवरामटोला २0, बोरटोला २२, खडकी ११, नवाटोला १८, वारव्ही २४, आंभोरा १९ तर चिचटोला १४ अशा ३२ शाळा बंद होणार असून त्याचा मोठा परिणाम दुर्गम भागातील मुलांच्या प्राथमिक शिक्षणावर होणार आहे.
यावरून शासनाचा दुष्ट उद्देश दिसत असून ग्रामीण भागातील मुले अशिक्षित राहावे, असे दिसत आहे. सदर शासन निर्णय शासनाने ताबडतोब रद्द करावा किंवा पयार्यी व्यवस्था म्हणून त्या भागातील मुलांच्या शिक्षणाकरिता शासकीय आर्शम शाळा सुरू कराव्यात अन्यथा अर्जुनी मोरगाव तालुका काँग्रेसच्या वतीने संबंधित गावांच्या पालकांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष भागवत नाकाडे, इंद्रदास झिलपे, इंजि. आनंदकुमार जांभुळकर, राजू पालीवाल, बन्मीधर लंजे, सुभाष देशमुख, हेमंत भांडारकर, सुनील लंजे, कृष्णा शहारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.