माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे व किशोर गजभिये यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

0
12

iaxof/e, ता.९: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे तसेच मुंबई महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त किशोर गजभिये यांनी आज नवी दिल्लीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दोघांचेही स्वागत केले.उत्तम खोब्रागडे यांनी आयएसएस झाल्यानंतर मुंबई उपनगर जिल्हाधिकारी, बेस्टचे महाव्यवस्थापक, आदिवासी खात्याचे प्रधान सचिव अशी महत्त्वाची पदे भूषविली आहेत. सनदी अधिकारी म्हणून निवृत्त झाल्यानंतर उत्तम खोब्रागडे यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये विद्ममान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात प्रवेश केला होता. आज त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

दुसरे स्वेच्छानिवृत्ती घेतलेले सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा राजीनामा देऊन खासगी कंपनीत नोकरी पत्करली होती. त्यानंतर त्यांनी मायावती यांच्या नेतृत्वाखालील बसपमध्ये प्रवेश केला. अनेक सामाजिक संघटनांशी ते संबंधित होते. जून २०१४ मध्ये त्यांनी नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढविली होती. त्यावेळी ते तिसऱ्या क्रमांकावर होते. त्यानंतर ऑक्टोबर २०१४ मध्ये त्यांनी बसपाच्या तिकिटावर उत्तर नागपूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन काँग्रेसचे दिग्गज नेते डॉ.नितीन राऊत यांना तिसऱ्या क्रमांकावर नेऊन ठेवले होते. त्यावेळी भाजपचे डॉ. मिलिंद माने अवघ्या १३ हजार ७१८ मतांनी विजयी झाले होते. दुसऱ्याच वर्षी २०१५ मध्ये बसपाचे एक दिग्गज नेते प्रा.डॉ.सुरेश माने यांना बसपाने पक्षातून बाहेर काढल्यानंतर त्यांनी बहुजन रिपब्लिकन सोशॅलिस्ट पक्षाची स्थापना केली होती. त्यांच्यासोबत किशोर गजभिये हेदेखील बीआरएसपीत गेले होते.  जवळपास अडीच वर्षे बीआरएसपीत काम केल्यानंतर गजभिये हे बीआरएसपीपासून दुरावलेले होते. अखेर त्‍यांनीही आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उत्तमराव खोब्रागडे व किशोर गजभिये यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला असला, तरी भाजपचे ज्येष्ठ नेत नितीन गडकरी यांच्याशी या दोघांचेही सुरुवातीपासूनच मधूर संबंध असल्याचे सांगण्यात येते.