युपी देशाचे प्रधानमंत्रीच नव्हे तर राजकारणाची दिशा ठरवते-अखिलेश यादव

0
22
खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.09ः– देशातील महाराष्ट्र व उत्तरप्रदेश या दोन्ही राज्यांची नाती ही एैतिहासिक व जुनी असून देशात या दोन राज्याने कृषीच्या क्षेत्रात भरघोस प्रगती केली आहे. देशाला साखरेची गोड चव पुरविण्यात ही दोन्ही राज्ये एकमेकांना पुरक ठरली आहेत. त्याचप्रमाणे देशाचे राजकारण घडविण्यासाठी उत्तर प्रदेशातील राजकारण दिशा देणारे असते. तिच दिशा देशाचे प्रधानमंत्री कोण बनेल हे ठरवत असते असे महत्वपूर्ण उद्गार उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काढले. ते  शिक्षण महर्षी स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११२ व्या जयंती निमित्त येथील डी.बी.सायन्य कॉलेजच्या प्रांगणात आयोजित गुणवंत विद्यार्थी सुर्वणपदक वितरण सोहळ्यात आज शुक्रवारला उद्घाटक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल पटेल हे होते. तर  प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अबु आझमी, प्रसिध्द गायक सोनू निगम, हास्य कलावंत राजू श्रीवास्तव, उत्कर्ष पारेख, माजी मंत्री अनिल देशमुख, उमादेवी अग्रवाल, आ. प्रकाश गजभिये, माजी मंत्री बंडूभाऊ सावरबांधे, विलास श्रृंगारपवार, नाना पंचबुध्दे, माजी. आ. अनिल बावणकर, रामरतन राऊत, दिलीप बन्सोड, सेवक वाघाये, मधुकर कुकडे,सुनिल फुंडे, विजय शिवणकर,नरेश माहेश्वरी, वर्षाताई पटेल,हरिहरभाई पटेल,माजी आमदार राजेंद्र जैन,निखिल जैन हे प्रामुख्याने उपस्थित होते. पूढे बोलताना यादव म्हणाले की, देशाचे चित्र सध्या अस्पष्ट असून चिंताजनक स्थिती निर्माण झालेली आहे. त्यातच बहुसंख्येने असलेला शेतकरी नोटबंदीपासून ते  जीएसटीपर्यंतच्या अनेक निर्णयामुळे हतबल झालेला आहे.केंद्र सरकारकडून शेतकर्यांच्या मालाला  योग्य तो हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला असून आत्महत्येपर्यंत पोहचला आहे. जेव्हापर्यंत राज्य व केंद्र सरकार शेतकर्यांच्या हितासाठी व विकासासाठी जोखिम स्विकारणार नाही. तोपर्यंत शेतकर्यांचा विकास शक्य नाही. आमच्या देशातील सर्वात सुरक्षित व मजबुत असा एक्स्प्रेस हायवे आम्ही बनविला ज्यावर लढाऊ विमानसुद्धा उतरविला जाऊ शकतो. मात्र,विद्यमान केंद्रातील सरकार आम्ही तयार केलेल्या हायवेवर लढाऊ विमान उतरवून स्वतःच केल्याचा गवगवा करण्याचा हास्यास्पद प्रयत्न करीत असल्याची टिका करून इतर देशातील कामकाजाची नकल करून आपल्या देशात राबविण्याचा प्रयत्नाने विकास होवू शकत नाही असे म्हणाले.जनतेची पंधरा लाखाच्या नावावर फसवणूक करून जर विरोधी पक्ष सत्तेत येत असेल तर, आम्हीही तीस लाख द्यायला तयार आहोत.आम्हालाही उत्तरप्रदेशच्या सत्तेत जनतेने बसवायला काय हरकत असा मार्मिक टोला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता हाणला.विद्यार्थ्यांना शिक्षणाक़डे लक्षे देण्याचे आवाहन करीत मनोहभाईंनी काबाडकष्ट करुन शिक्षण घेतले.ते शिक्षण सर्वांना मिळावे यासाठी त्यांनी आपल्या मनात बांधलेली गाठ त्यांचे पुत्र प्रफुल पटेल यांनी शिक्षणसंस्थेचा विस्तार करुनच नव्हे तर अत्याधूनिक व व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून सुरु ठेवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे संचालन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.तर आभार हरीहरभाई पटेल यांनी मानले. कार्यक्रमाला भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.