येगाव पॉलिथीनमुक्त करा,विद्यार्थ्यांचे सरपंचांना निवेदन

0
14

अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे)दि.14 : गाव स्वच्छ करण्यासाठी सरसावलेल्या ‘नो स्पीच ग्रुप’ने गाव पॉलिथीनमुक्त करण्याची मागणी केली असून यासाठी सरपंचांना निवेदन दिले आहे. यात त्यांचा खर्रा पन्नीवर जोर असून ग्रुपच्या या चिमुकल्यांनी मागणीवर त्वरीत कारवाईची मागणी केली आहे.
गावातील जिल्हा परिषद वरिष्ठ शाळेतील आजी-माजी विद्यार्थ्यांनी ‘नो स्पीच ग्रुप’ तयार केला असून दोन तास गावासाठी उपक्रम ते राबवीत आहेत. यांतर्गत दर रविवारी ग्रुपचे सदस्य गावात स्वच्छता अभियान राबवित आहेत. मात्र दुसऱ्या दिवशी गावात पॉलीथीन दिसत असून त्यात खर्रा पन्नींचे प्रमाण सर्वाधिक प्रमाणात आढळत आहे.
खर्रा पन्नीचा काहीच वापर होत नसून त्यापासून खतही तयार होत नाही. शिवाय यामुळे प्रदूषण व वातावरणाला अपायकारक असल्यामुळे यावर तोडगा म्हणजे गावात पॉलीथीन बंद करणे हाच उपाय आहे. करिता ग्रुपने गावच्या सरपंच कल्पना फुंडे यांना निवेदन देऊन गाव पॉलीथीन मुक्त करण्याची मागणी केली. या अर्जाची प्रतिलिपी पंचायत समिती सभापती व खंडविकास अधिकाऱ्यांनाही पाठविण्यात आली आहे.
गु्रपचे सुगमकर्ता भुषण लोहारे यांनी, ओल्या कचऱ्याचे आपण कंपोस्ट खत तयार करु शकतो व तसा उपक्रम शाळेत राबविला जातो. पण झिल्लीचा काहीच फायदा नसून त्याचा वापर कमी अथवा बंद व्हावा यासाठी अधिकारी तथा जनप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन या चिमुकल्यांच्या प्रयत्नात सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या या कार्याला आता उपसरपंच सुरेश राऊत, मोरेश्वर फुंडे आणि गावकरी जुळत असून त्यांच्या कार्याला प्रेरित करीत आहेत.