बांधकाम सभापती कॉंग्रेसच्या गोटात, भाजपला मोठा धक्का

0
7
गोंदिया न.प.त सभापतीपदी मंसुरी, साहू, बोबडे, चौधरी व मानकर यांची वर्णी
गोंदिया : गोंदिया नगर परिषदेच्या एक वर्षाच्या कार्यकाळानंतर शुक्रवारी (ता.१६) झालेल्या विषय समिती सभापतीच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा एक, भाजपाचे चार सभापतींची वर्णी लागली आहे. राकॉंचे एक सदस्याने मतदानात सहभाग न घेतल्याने समान मते मिळाल्याने कॉंग्रेसचे शकील मंसुरी बांधकाम व भाजपचे दीपक बोबडे हे पाणीपुरवठा विभागाचे सभापती म्हणून ईश्वर चिठ्ठीने झाले. यात बांधकाम सभापतीपद आश्चर्यकारकरित्या कॉंग्रेसच्या गोटात गेल्याने शहरात मोठी चर्चा आहे.
नगर रचना विभागाच्या सभापतीपदी भाजपाच्या रत्नमाल साहू, शिक्षण सभापतीपदी आशालता चौधरी, महिला व बालकल्याण सभापतीपदी विमला मानकर या निवडून आल्या. एकूण ११ मतांपैकी एक सदस्य अनुपस्थित असल्याने बांधकाम सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपाचे धर्मेश अग्रवाल व कॉंग्रेसचे शकील मंसुरी यांना समान मते मिळाली. तसेच पाणीपुरवठा सभापतीपदाच्या निवडणुकीत भाजपाचे दीपक बोबडे व कॉंग्रेसचे क्रांती जायस्वाल यांना समान मते मिळाली. त्यामुळे या दोन्ही पदासाठी ईश्वरचिठ्ठीने निवड करण्यात आली. यात बांधकाम सभापतीपदी शकील मंसुरी व पाणीपुरवठा सभापतीपदी दीपक बोबडे यांची वर्णी लागली.
नगर रचना, महिल व बालकल्याण, शिक्षण विभागाच्या सभापतीपदासाठी राकॉंचे दोन सदस्यांनी मतदानात सहभाग न घेतल्याने भाजपाच्या रत्नमाला शाहू, विमला मानकर व आशालता चौधरी पाच मते घेवून विजयी झाल्या. यात बसपच्या जोत्सना मेश्राम, गौशिया शेख, कॉंग्रेसच्या निर्मला मिश्रा पराभूत झाल्या.  यात विशेष म्हणजे, पालिकेत भाजपा विरूद्ध इतर सर्व एकत्रीत येवून कॉंग्रेसचा सभापती झाल्याने, ते ही बांधकाम विभाग मिळाल्याने कॉंग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण होते.
भाजपाला मोठा धक्का
भाजपाची सत्ता केंद्रापासून तर राज्यात आणि नगर परिषदेत नगराध्यक्ष असताना विकासाचे कार्य करण्यासाठी बांधकाम विभाग फार महत्वाचे मानले जाते. दरम्यान पालिकेत पक्षीय बलाबल पाहता ४२ सदस्यांपैकी भाजप १८, कॉंग्रेस ९, राकॉं ७, बसपा ५, शिवसेना २ व अपक्ष १ सदस्य आहेत. यात नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडणुकीत कॉंग्रेसला अध्यक्षपद गेल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. यातच आजच्या निवडणुकीत बांधकाम सभापतीपद ईश्वरचिठ्ठीने का असो ना कॉंग्रेसने हिसकावल्याने भाजपाला हा मोठा धक्का असून कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर पहायला मिळाला. यात झालेल्या राजकारणाचा कोणता नफा वा नुकसान कुणाला सोसावे लागेल, हे भविष्यात कळेल.