क्रीडा स्पर्धांमधून सांघिक भावना वृध्दिंगत होण्यास मदत – विभागीय आयुक्त पीयूष सिंह

0
9
 जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी विभागीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन
आकाश पडघन
वाशिम, दि. 23 : जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये सांघिकपणे काम करण्याची भावना वृध्दिंगत होते. त्यामुळे कार्यालयीन कामकाजात गतिशीलता येण्यास मदत होईल, असे मत अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी आज व्यक्त केले. येथील जिल्हा क्रीडा संकुलमध्ये दि. 23 ते 25 फेब्रुवारी 2018 दरम्यान आयोजित जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी यांच्या विभागीय क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. वाशिम जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. विभागीय आयुक्त सिंह यांच्या हस्ते ध्वजारोहण व क्रीडा ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शन्मुगराजन, अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामुर्ती, उपायुक्त राजाराम झेंडे, वाशिम जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती सुधीर गोळे, समाजकल्याण समितीच्या सभापती पानुताई जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडनिस, अकोला जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे, अमरावती जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वानखेडे, कैलास घोडके आदी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त श्री. सिंह म्हणले, जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी गेल्या काही वर्षांपासून विभागीय स्तरावर क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन केले जात आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. या स्पर्धांमुळे जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना आपले विविध खेळांमध्ये आपले कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होते. तसेच त्यांना इतर जिल्ह्यात सुरु असलेल्या चांगल्या उपक्रमाबाबत माहितीची देवाणघेवाण करण्याची संधी मिळते. स्पर्धेत प्रत्येक सहभागी प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी या संधीचा उपयोग करून घेऊन या स्पर्धेच्या निमित्ताने नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबत मंथन करावे, असे आवाहनही विभागीय आयुक्तांनी यावेळी केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती देशमुख म्हणाल्या, जिल्हा परिषदेचे सेवेत अनेक प्रतिभावान खेळाडू रुजू होतात. मात्र त्यांच्या क्रीडा कौशल्यांना वाव न मिळाल्याने ते दुर्लक्षित राहतात. यापुढे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अशा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील.
जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी क्रीडा मंडळाचे सचिव प्रमोद कापडे यांनी प्रास्ताविक केले. या स्पर्धेत महिला व पुरूष यांचे 59 संघ सहभागी झाले आहेत. यामध्ये विभागातील 5 जिल्हा परिषद व विभागीय आयुक्त कार्यालयातील संघांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी क्रीडा स्पर्धेत सहभागी संघांनी पथसंचालनातून आपापल्या जिल्ह्यातील वैशिष्ट्ये, विविध जनजागृतीपर देखावे सादर केले. यामध्ये वाशिम जिल्हा परिषद संघाने ‘मुलगी वाचवा’चा संदेश देणारे व बालकामगार समस्येविषयी जनजागृती करणारा देखावा सादर केला. बुलडाणा जिल्हा परिषद संघाने अमरावती विभागातील विविध वैशिष्ट्ये, जिजाऊ जन्मस्थान, विभागात झालेले संत आदी विषयी माहिती देणारा देखावा सादर केला. अकोला जिल्हा परिषद संघाने राष्ट्रीय एकात्मता तर यवतमाळ जिल्हा परिषद संघाने आपल्या देखाव्यातून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा संदेश दिला.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम ईस्कापे, उप अभियंता निलेश राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी शेलोकार, शुभदा पाटील, विनय थोरात, रूपेश निमके, मुकुंद नायक, एच. जे. परिहार, प्रफुल्ल काळे, सचिन गटलेवार, प्रविण राऊत,मारोतकर, प्रविण आरु, शेलकर, पवार, भगत, सिदार्थ गायकवाड, सहदेव चंद्रशेखर, कुणाल तायडे, उमेश बोरकर, अमोल कापसे, तुषार जाधव, नंदकिशोर इंगळे आदी अधिकारी-कर्मचारी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.कार्यक्रमाचे संचालन राजु सरतापे यांनी केले. तर आभार प्रदर्शन ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता ए. एम. खान यांनी केले.