…तर अधिवेशनात गोंधळ घालणार-एकनाथ खडसे

0
13

जळगाव,दि.24 : मॅग्नेटिक महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्राला एक दमडीचाही लाभ मिळालेला नाही, हा अन्याय असल्याची भावना व्यक्त करीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारला घरचा अहेर दिला. शिवाय अमळनेर, बोदवड आणि मुक्ताईनगर हे तालुके दुष्काळी जाहीर झाले नाही तर आपण विधानसभेत आवाज उठवू, असा इशाराही त्यांनी दिला.
अमळनेर तालुक्यात शुक्रवारी विकासकामांचा शुभारंभ खडसे यांच्या हस्ते झाला. मॅग्नेटिक महाराष्ट्र या गुंतवणूक परिषदेत १५ लाख कोटींचे करार झाले, पण उत्तर महाराष्ट्राला एक दमडीचाही प्रकल्प मिळालेला नाही, अशी खंत खडसेंनी व्यक्त केली. मी काय पाप केले आहे? पक्षाचे काय वाईट केले आहे? मी दोषी असेल तर सरकार मला का तुरुंगात टाकत नाही? माझ्यावर कसा अन्याय होत आहे, ते जनतेला माहिती आहे, अशी उद्विग्न भावनाही खडसेंनी व्यक्त केली.
३० हजार कोटींची कर्जमाफी झाली तरी शेतकरी अस्वस्थ का आहे ? दुष्काळाबाबत पाठपुरावा करून कामे होत नसतील तर मला बोलावे लागेल. दुष्काळ जाहीर करायला इतका वेळ का लागतो, असा सवाल करत सगळा पोरखेळ सुरू असल्याची टीका खडसेंनी केली.